‘मतभेद’ म्हणता-म्हणता ‘मनभेद’च होतोय….!

It is understanding that gives us an ability to have peace. When we understand the other fellows viewpoint and he understands ours, then we can sit down and workout our differences. अर्थात ‘समज’ ही अशी गोष्ट आहे, जी आपल्याला मनःशांती मिळवण्याची क्षमता देते. जेंव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेतो आणि त्याला आपला दृष्टिकोन समजावून सांगतो. तेंव्हाच आपण एकत्र बसून एकमेकांतील ‘मतभेद’ दूर करू शकतो.

आजकाल दोन व्यक्ती, मग नात्याने त्या कुणीही असतील….दोन मिनिटे देखील एकमेकांशी सुखसंवाद साधू शकत नाहीत हीच खरी वस्तुस्थिती आहे. त्याला कारणे अनेक असतील. आर्थिक विवंचना, कामातील ताण-तणाव, दगदगीचे-धावपळीचे जीवन, विसंवाद, दुर्धर आजारामुळे निर्माण होणारा चिडचिडेपणा अशी असंख्य कारणे आहेत. पण यावर मात करून विजय मिळवण्यासाठी निसर्गानेच तुम्हाला Inbuilt एक शक्ती प्रदान केली आहे. ती म्हणजे ‘समज’. पण या शक्तीचा वेळेवर कितीजण उपयोग करतात. सगळीकडे कलकलाट, गोंधळ, आरोप-प्रत्यारोप, संशय आणि समजुतदारपणाचा अभाव दिसून येतोय. म्हणूनच दोन व्यक्ती घटकाभर शांततेने संवाद साधताना अभावानेच दिसतात. अशी कोणती खदखद, अशांतता, राग, द्वेष मनामध्ये धुमसत असतो, हे एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय कसं कळणार ? आजकाल ‘मतभेद’ आणि ‘मनभेद’ हे शब्द फारच राजकीय झाले आहेत. रोज उठून टीव्हीवरच्या बातम्यांमधून, वर्तमानपत्रांच्या रकान्यातून, सोशल मिडियामधून हे अर्थहीन झालेले शब्द मना-मनामध्ये ठसले जात असल्याने बोथट संवेदना झालेली मने या घासून घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांचा एकमेकांवर मारा करू लागले आहेत. समोरच्या व्यक्तीचा एखादा विचार किंवा कृती आपल्याला पटली नाही एव्हढेच निमित्त सुरुवातीला ‘मतभेद’ जाहीर करायला पुरेसे ठरते. listening Power नष्ट व्हायला लागल्याने समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेताच आपलीच भूमिका ठाम असल्याचे सिद्ध करण्याचा अट्टहासापायी सुरुवातीला होणाऱ्या ‘मतभेदा’चे रूपांतर हळूहळू ‘मनभेदा’मध्ये होताना दिसत आहे.

तुम्ही जर समोरच्याची बाजू ऐकून घेण्याची तयारी ठेवणार असाल तर तुमच्यातील संवेदनशीलता कार्यान्वित आहे असे म्हणता येईल. एकतर समोरच्या व्यक्तीची बाजू तुम्ही स्वीकारावीच असा त्याचाही आग्रह नसतो. शिवाय तुम्हालाही स्वीकारली पाहिजे असं बंधन नसते. पण ऐकण्याची तयारी दाखविली ही कृती दोघांसाठी सकारात्मक ठरू शकते. कदाचित त्याची बाजू ऐकून घेतल्याने वस्तुस्थिती पर्यंत पोहोचायला मदतच होवू शकते. पण आज ऐकून घेण्याची मानसिकताच कमी होत चाललीय. ज्याला-त्याला फक्त व्यक्त व्हायची घाई झालेली दिसते. व्यक्त होण्याची क्रिया देखील पुढे जावून संथ होत असते. अगदी धबधब्या सारखं. धबधब्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह कसा बेलगाम असतो. पण तो तेव्हढ्या पुरताच. उंचीवरून खाली कोसळताना पुढे तो पात्राच्या आकारमानात मिसळून संथ होवून जातो. व्यक्त होण्याची क्रिया देखील समोरच्या व्यक्तीच्या स्विकारण्याच्या भूमिकेत मिसळून जाणारी असेल तरच तो ‘संवाद’ होतो.

मुळात आमच्यात ‘मतभेद’ आहेत असं म्हणणारी माणसे एकतर ढोंगी असतात किंवा ती आक्रस्ताळी स्वभावाची असतात. आम्ही समोरच्याशी जुळवून घेतोय हे सांगण्याचा प्रयत्न करताना ते मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असा शब्दांचा मुलामा चढवीत असतात. मनभेद असेल तरच मतभेद होईल ना..! समोरच्याची कसलीच भूमिका तुम्हाला स्वीकारायची नसेल तर मनभेद आहे हेच उघड होतंय ना…मग मतभेद आहेत या म्हणण्याला तरी काय अर्थ उरतो…? मुळात या अवस्थेत पोहोचायचं नसेल तर ‘संवाद’ हवा. एकमेकांना मिसळण्यासाठी स्वतःच्या हृदयात थोडी ‘स्पेस’ ठेवणार असाल तर आपोआपच तुम्ही त्याचे अस्तित्व मानता याची समज तयार होते. मग याप्रक्रियेतूनच समजून घेण्याची आणि समजावण्याची क्रिया-प्रतिक्रिया सुरू होते. हेच तर आपण विसरत चाललोय….मग नुसतेच मतभेद आणि मनभेदाच्या शब्दच्छलात अडकून पडतोय. त्यामुळेच ‘मतभेद’ म्हणता-म्हणता ‘मनभेद’च होतोय….पटलं तर व्हय म्हणा. 🙏🙏

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

8

)

  1. Randhir Abhyankar

    खुपच छान वैचारिक लेखन आहे…..जडही आहे👆👆👆👌👌👌👍👍👍

    Like

  2. gosavimanik123

    सर अगदी बरोबर आहे समोर च्या व्यक्तीने आपले
    ” मत ” मांडल्यावर ते बरोबर की चूक आहे हे संवादातूनच समजणार आहे त्यामुळे ” मन ” भेद
    होणार नाही ✍️✍️👌👌🙏🙏
    ” Listening Power ” ☑️☑️

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद माणिक 🙏🙏🙏

      Like

  3. Marathi Bana

    खूपच छान सर 👍🙏👌

    Like

  4. KK

    अप्रतिम ।

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद केकेजी 🙏🙏

      Like

  5. appachaugule

    आपल्या नुसार दोघांमधील मतभेद आणि मनभेद यातील दरी संपवण्यासाठी ” संवाद ” आवश्यक आहे . परंतु त्या दोघांमध्ये एकमेकांच्या विरोधात तिरस्कार, द्वेष, घृणा, अहंकार, राग,… एवढा भरलेला असतो की संवादाची ” मुस्कटदाबी ” होते. आणि त्यांच्यातील भेदाची दरी वाढत जाते.
    त्यामुळे संवादाच्या आधी त्यांच्यातील एकमेकांविरोधातील मळभ दूर अथवा कमी करणे आवश्यक आहे.

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      अगदी बरोब्बर आहे आप्पासाहेब 👍👍

      Like