प्रेरणेशिवाय ‘सार्थकता अशक्य…!

What motivates you? किती साधा प्रश्न आहे…एका वाक्यात विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचं उत्तरही एका वाक्यात दिलं जाऊ शकतं. पण जे प्रेरणास्थानाचा किंवा प्रेरणादायी व्यक्तींचा ‘आदर’ करत असतील त्यांच्यासाठी अगदी त्रोटक वाक्यात किंवा कमीत कमी शब्दात उत्तर दिलं तरी चालण्याजोगे आहे. पण ज्यांच्या आयुष्यात प्रेरणाच नाही, प्रेरणास्थान किंवा प्रेरणादायी व्यक्तीच आलेली नसेल त्यांचं काय ? ते या प्रश्नाचं उत्तर देवू शकतील..?

आपण कोणतंही साधं यश मिळवलं तरी देखील मिळवल्याचा जल्लोष करतानाच या यशामागे नेमकी प्रेरणा कुणाची होती ? हे सांगण्यासाठी अधीर असतो. किंबहुना आपले अभिनंदन करण्यासाठी जमलेल्या गर्दीला तीच उत्सुकता बाकी असते. ‘अपयशाचं ओझं आपल्या एकट्याच्या शिरावर घ्यावे, मिळालेले यश मात्र सर्वांना द्यावे’ हीच आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. हे संस्कार लहानपणापासून आपल्यावर झालेले असल्याने संस्कारित म्हणून आपल्या अंगी ते लगेच दिसून येतात. प्रेरणा ही आपल्याला नुसताच यशाचा मार्ग दाखवत नाही. तर त्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरक असे मार्गदर्शन देखील करत असते. त्यामुळेच यशाचा मार्ग कितीही खडतर असला तरी आपण प्रयत्नांती उद्दीष्ठापर्यंत पोहोचतो. पण जर कोणतेही प्रेरणास्थान नसेल, जगण्याचे उद्दिष्ट्य नसेल तर…? असं म्हणतात की, मुक्या प्राण्याला देखील शिकवण दिली तर ते देखील त्यातून उतराई म्हणून प्रेरणादायी व्यक्तीच्या चरणी आपले जीवन समर्पित करत असते. तसे तर भटक्या प्राण्यांसारखी भटकी माणसे देखील असतात. कोणतेच ध्येय नसते, उद्दिष्ट्य नसते. तरीही ते जगत असतात. फक्त शरीराची नैसर्गिक मागणी (भूक) शमविण्यासाठी दिवसरात्र दुसऱ्यांसमोर हात पसरून भीक मागत असतात. अशा झुंडींना कधी आपण विचारतो….हे असं जगण्यामागची तुमची प्रेरणा कोण..?

आजकाल कोणत्याही शहरात बघाल तिथे बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, अग्यारी, शासकीय कार्यालयाच्या कंपाऊंड बाहेर एव्हढंच काय, चौका-चौकातून, प्रमुख बाजारपेठांमधून जगण्याची कोणतीही ‘प्रेरणा’ नसणारे, भविष्य नसणारे भिकारी झुंडीच्या झुंडीने आपले अंगविक्षेप आणि विचित्र हावभाव करीत लाचार पण किळसवाणी याचना करताना प्रसंगी भीक मिळविण्यासाठी अंगावर चालून येतात. ह्या झुंडी अचानक वाढतात कश्या ? त्या आपल्याच शहरात का बरं येतात ? ते स्वतः येतात की त्यांना कुणी आणून सोडतं..? भिकाऱ्यांच्या देखील टोळ्या चालविल्या जातात. त्यांचा देखील एक म्होरक्या असतो. त्याच्या जगण्याचं एकमात्र उद्दिष्ट्य असतं…. आपल्या टोळीतील भिकाऱ्यांनी रोज जास्तीतजास्त भीक गोळा करायची. यासाठी तो कोणत्याही थराला जात असतो. या धंद्यात आणणारा त्याचाही म्हणे एक ‘गुरू’ असतो. त्याच्याकडून ‘गंडा’ बांधून मगच शागिर्दी मिळत असते. गुरुची जागा रिकामी झाल्यावरच शागिर्दाला गुरुचे स्थान मिळत असते. त्यामुळे महत्प्रयासाने गुरू बनलेल्या शागिर्दाचे प्रेरणास्थान त्याचा गुरू असतो.

ज्यांना ‘भूतकाळ’चा जाज्वल्य इतिहास नसतो अशांना वर्तमान आणि भविष्यकाळ देखील नसतो. अशी माणसे प्रेरणाहीन अवस्थेत आयुष्याची फक्त ‘वखवख’ जगत असतात. पण समाजसंस्कारित आणि मनुष्य म्हणून मिळालेला ‘अमूल्य’ जन्म सार्थकी लावण्यासाठी ध्येय उराशी बाळगून जगणारे आपल्या प्रेरणास्थानाचा नेहमीच गौरव करीत अपयशाला समर्थपणे तोंड देत यशाकडे मार्गक्रमण करीत असतात. हे आर्टिकल तुम्ही वाचत असताना आज सायंकाळी ( २३ ऑगस्ट) चांद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग यशस्वीपणे होणार आहे. भारत आज महाशक्ती म्हणून जगातल्या प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. पुराणातील देव, देवपुरुष, महात्मे, इतिहासकालीन आदर्श या दैवतांच्या प्रेरणेतूनच भारत चंद्रावर यशस्वीपणे पोहचत आहे. हीच तर आता नव्या पिढीची प्रेरणा ठरणार आहे. हा क्षण ‘याची देही याची डोळा’ आपल्याला बघायला मिळत आहे हेच आपल्या जीवनाचे ‘सार्थक’ आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to gosavimanik123 उत्तर रद्द करा.

Comments (

1

)

  1. gosavimanik123

    ✍️✍️🙏🙏

    Like