आश्वासक वाटते ती कातरवेळ…!

What’s your favorite time of day?

If someone asks us that, we give different answers to everyone. Why this happening ? You should also think about this…There are some questions, which seem very simple from above, but are confusing while answering…Same happened to me. I can’t say that I have a favorite time from dawn to midnight. Because I don’t like that time everyday… Wouldn’t you have the same opinion…?

दिवसभरातील कोणता वेळ तुमच्या आवडीचा आहे ? असं जर आपल्याला कुणी विचारलं, तर प्रत्येकाला आपण वेगवेगळे उत्तर देतो. असं का होत असेल बरं..? तुम्ही देखील हा विचार करून बघा…काही प्रश्नच असे असतात, वरून अतिशय साधे वाटले तरी उत्तर देताना गोंधळात टाकणारे…माझं तर असंच होतं. मला तर अगदी पहाटे पासून ते अगदी मध्यरात्री पर्यंत अमुक एक वेळ आवडीची आहे, असं नाही सांगता येत. कारण प्रत्येक दिवशी ती वेळ मला आवडेलच असं काही नाही….तुमचंही असंच काहीसं मत असेल ना…?

पहाटे-पहाटे निरव शांततेत हलकेच पडणाऱ्या दवबिंदूमुळे हवेतला गारवा मोहरून टाकतो, पण एखाद्या दिवशी हा अनुभव सुखद वाटतो. रोज झोपमोड करून तेव्हढ्यासाठी पहाटे उठणे म्हणजे कटकटीचे वाटते. पहाटे वाचलेलं चांगलं लक्षात राहतं…असं म्हणून लहानपणी घरातले सगळे ज्येष्ठ गदागदा हलवून झोपेतून उठवून अभ्यासाला बसवायचे…कधीतरी ‘गृहपाठ’ पूर्ण झाला नसेल तर ठीक वाटायचं पण रोज पाठांतरासाठी उठणे म्हणजे शिक्षाच की..! मग कसली आलीय ‘good morning’. हल्ली सोशल मीडियावर रोज न चुकता ‘good morning-good night’च्या पोस्ट पाठविणाऱ्यांची मला कमालच वाटते. बरं आज अमुक वेळेला मला आनंदी ठेवणारी घटना घडली म्हणजे उद्या त्याच वेळेला पुन्हा मला आनंदी करणारी घटना घडेल, असं कुणी ठामपणे सांगू शकेल का..? ते अध्यात्मवाले किंवा पॉझिटिव्हीटी पसरविण्याचे महानकार्य करणारे लोक प्रत्येक सेकंदाला महत्वाचं समजून सदा आनंदी राहण्याचा मंत्र सांगतील पण दिवसभरातील अमुक एक वेळ चांगली असं नाही सांगू शकणार… ज्योतिषी तर शास्त्राचा दाखला देत दिवसातील चांगला-वाईट काळ देखील सांगतात. अगदी घटका-पळांचा हिशोब मांडत पटवून सांगतात. आनंद किंवा दुःख असं वेळापत्रकाप्रमाणे ठरलेल्या वेळेलाच घडेल हा त्यांच्या आवडीचा आणि उदरनिर्वाहाचा विषय असतो. पण शेवटी ती तर्कावर आधारित भाकिते असतात. जसा जन्म आणि मृत्यूची वेळ कुणीच सांगू शकत नाही. अगदी तसंच दिवसभरातील अमुक एक वेळ सुखाची किंवा दुःखाची हे सांगणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धाच.

‘वेळ काही सांगून येत असती का ?’ हे म्हणणं सुखात आणि दुःखात आपल्या भावना व्यक्त करण्याची सुरुवात असते किंवा फारतर तशी समजूत असते असं आपण म्हणू शकतो. मी तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आपल्याला घातवार असलेल्या दिवशी अवघड विषयाचा पेपर असू नये म्हणून अक्षरशः देवाला साकडे घालायचो. पण व्हायचं तेच घडणार…अभ्यास करायचा नाहीपण दैव सोबत आहे ही शेखी आपल्यालाच अडचणीत आणणारी ठरायची. नोकरीला लागल्यावर देखील सकाळी ऑफिसमध्ये पाय ठेवताना डावा की उजवा पाय पुढे होतोय त्यावर दिवसभराचे शुभशकुन ठरायचे…बॉसला राहुकाल सोडून कधी संवाद साधायचा याचंही उत्तम ज्ञान संपादित केलं असलं तरी देखील बॉस कोणत्या कारणावरून आणि कोणत्या वेळेला सटकेल हे अचूकपणे निदान करणारे पंचांग मला तरी मिळाले नाही. आज दिवस शुभ आहे असं भविष्य असेल तर नेमकं त्याच दिवशी ‘विचका’ करणारी गोष्ट आपल्या हातून घडतेच. याउलट शनिवारी, अमावसेला-पौर्णिमेला चांगलं काहीतरी घडून जातं. शेवटी आनंद-सुख देणाऱ्या घटना कोणत्याही वेळेत घडतात…तश्याच अप्रिय घटनाही घडतात. त्यामुळे दिवसभरातील आवडीची वेळ नक्की सांगता येत नाही…पण दिवसभर आग ओकून नंतर शांतपणे मावळतीला दिसेनासा होणारा सूर्य जी वेळ साधतो ना….ती वेळ नाही म्हंटलं तरी जीवाला उल्हासित करणारी असते. आजचा लेखाजोखा मांडल्यावरही उद्याचा आशावाद जागवत पुन्हा येण्याचा शिरस्ता पाळणारे काळाचे कालचक्र सूर्याला देखील तुमचा मित्र बनवणारे असते. आज अस्ताला गेला तरी उद्या येणार आहे ना…! शेवटी तोच सत्य आणि स्थिर आपण कधीतरी पुन्हा न येण्यासाठी कायमचे जाणारे….म्हणूनच रोज नवी आणि आश्वासक वाटते ती कातरवेळ…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. Priti

    Sometimes it happens to everyone. 👌

    Like

  2. Nilkanth Watte

    Very nice 👌👌

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद वकील साहेब 🙏🏼🙏🏼

      Like