निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी ‘चालणे’ आवश्यक…!

What daily habit do you do that improves your quality of life?

It is said that man is a slave of habit. Doing a good or bad action regularly at fixed time is called ‘practice’ and an action done by practice is called ‘habit’. So what is an action that you practice that will improve your quality of life ? If someone asks me such a question, my answer is that I complete my daily tasks on my foot every day as much as possible.

माणूस हा सवयीचा गुलाम आहे असं म्हणतात. एखादी चांगली किंवा वाईट कृती नित्यनेमाने ठरलेल्या वेळी करणे याला आपण ‘सराव’ असं म्हणतो आणि सरावाने केल्या जाणाऱ्या कृतीला आपण ‘सवय’ असं म्हणतो. तर अशी कोणती कृती आहे जी तुम्ही सरावाने करता, ज्यामुळे तुमचे जीवनमान उंचावलेले असते ? असा प्रश्न जर मला कुणी केला, तर मी दैनंदिन कामे शक्यतो पायी चालत पूर्ण करतो असेच माझे उत्तर असते.

पोरवयात आणि तरुणपणी एकतर घरातली शिस्त आणि आर्थिक नियोजन यामुळे चाकोरीबद्ध जगणं होतं. वडिलांची साखर कारखान्यातील नोकरी असल्याने कारखाना साईटवरच वसाहती मधून राहणे असायचे. राहत्या घरापासून किमान पाच किलोमीटर अंतरावर बाजारहाटीचं आणि शालेय शिक्षणाची सोय असणारं गाव असायचं. ही परिस्थिती सांगण्याचं कारण म्हणजे प्राप्त परिस्थितीनुसार शाळकरी वयापासूनच पायी ‘चालणे’ नशिबी आलेलं. पुढे चालणे अंगवळणी पडत गेले. आता चालणे ही ‘सवय’ बनले आहे. पण जशी ‘समज’ वाढू लागली तसे पायी चालण्याचे महत्व अनुभवातून पटू लागले. एकतर शरीरस्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी चालण्यासारखा उत्तम व्यायाम दुसरा कुठलाच नाही. जीवन जगत असताना तो परमेश्वर आपली परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे संकटरूपी अडथळे समोर करत असतो. पण त्या अडथळ्यांवर ‘मात’ करण्यासाठीच परमेश्वराने आपल्याला देहाची सर्व अवयवे आणि तेजस्वी इंद्रिये दिलेली असतात. आपल्या जवळच सर्व उपाय दिलेले आहेत. योग्यवेळी त्याचा उपयोग केला की संकटातून ‘नैया’ पार झाली म्हणून समजायचं.

चालण्यातून फक्त आपली गरीबी झाकण्याचा प्रयत्न होतोय असा गैरसमज बाळगू नकात….कारण कित्येक गर्भश्रीमंत लोकांना चालण्याचे महत्व पटल्यानंतर त्यांनी आपल्या आलिशान, महागड्या वाहनांचा ताफा सोडून पायी चालणे पसंद केले आहे. मी कुणी ‘तर्कतीर्थ’ नाही की कुणी ‘तत्वज्ञ’ नाही….एक साधा मध्यमवर्गीय माणूस आहे. ज्याला चारचौघात आजही आपली स्वतःची ‘ओळख’ सांगण्या इतपतही स्वतःजवळ ‘कर्तृत्वाची’ शिदोरी नाही. पण आत्मविश्वास वाढण्याबाबत माझ्या अनुभवातून तयार झालेलं ‘मत’ मी इथं मांडतोय, हवं तर तुम्ही त्याला ‘तर्क’ म्हणू शकता. चालताना आपल्या शरीराचा आणि सर्व इंद्रियांचा ‘समतोल’ राखत आपली पावले पडत असतात. सर्व इंद्रियांचा आदेश पाळतच ही पावले पडत असल्याने आपोआपच चालण्याची गती आणि इंद्रियांची क्रिया-प्रतिक्रियांची गती समान असते. त्यामुळे तुम्ही चालताना ज्या विषयावर विचार करत असता त्याच्या ठाम निर्णयावर तुम्ही पोहचता. ही गती तुम्हाला वाहन चालवताना मिळत नाही. त्या अवस्थेत इंद्रियांच्या क्रिया-प्रतिक्रियांच्या गती पेक्षा वाहनाची गती जास्त असते. त्यामुळे तुम्ही वाहन चालवताना ज्या विषयाचा विचार करता त्याच्या ठाम निर्णयापर्यंत पोहोचण्यात तुम्ही अपयशी ठरता. त्यावेळी तुमचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो. तुम्हाला याची खात्री करून घ्यायची असेल तर अगदी सोप्प आहे….पहाटे फिरायला निघालात की चालताना आजच्या दिवसभरातील कामाचा एक गोषवारा तयार करा…बघा काय गम्मत होतेय ती. नक्कीच दिवसभरातील ठरवलेली सर्व कामे तुमच्या बाजूने सकारात्मक निर्णय देणारी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. अर्थातच त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शेवटी समाजाला नवा विचार देणारे आपल्याकडचे सर्व संत, तत्वज्ञ पायी चालत भ्रमंती का करत होते ? बघा…..हा तर्क पटला तर दिवसातून काही किलोमीटर नक्की चालण्याचा सराव करा. झाला तर फायदाच होईल, गुंतवणूक काही नाही….नुकसानही काही नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.

Comments (

5

)

  1. jnzende

    अगदी बरोबर

    Liked by 1 person

  2. gargisolapur

    चाल ( णे ) पुराण आवडलं…” चल अकेला , चल अकेला , तेरा मेला पिछे छुटा राही चल अकेला “

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद सरजी 🙏🏻🙏🏻

      Liked by 1 person

  3. gosavimanik123

    आजच्या दिवसभरातील कामाचा गोषवारा
    तयार करणे……✍️✍️👌👌💐💐

    Liked by 1 person

  4. Rupali

    All truly great thoughts are conceived by walking – Philosopher Nietzsche

    Liked by 1 person