It is true that we love life, not because we are used to living, but because we are used to loving. There is always some madness in love, but in madness there is also always some reason.
हे खरे आहे की, आपण जीवनावर प्रेम करतो कारण आपल्याला जगण्याची सवय आहे म्हणून नाही तर आपल्याला प्रेम करण्याची सवय आहे म्हणून. प्रेमात नेहमीच काही ना काही वेडेपणा असतो आणि या वेडेपणाला देखील काही ना काही कारण असते.

१९५३ पासून मराठी मनांवर रुंजी घालणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गीत अरुण दाते यांच्या अवीट आवाजाने आजही जगण्यावर हजारदा प्रेम करायला लावते. आकाशवाणीवर हे गाणं ऐकून लहानाची मोठी झालेली आमची पिढी जगण्यावर खरंच प्रेम करायला शिकली. महाविद्यालयीन वयात असताना म्हणजे १९८३ च्या सुमारास बॉलिवूड सुपरहिट फिल्म ‘सदमा’ देखील आजही पुन्हा-पुन्हा पहावीशी वाटते. चित्रपटाचं कथानक, कमल हसन आणि श्रीदेवीचा अभिनय ह्या तर जमेच्या बाजू आहेतच पण त्याच बरोबर ईलाइराजा यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील ‘ये जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना’ हे गाणं जगण्याचा नवा अर्थ शिकवणारे ठरले. आजच्या पिढीलाही हे गाणं आवडतं यातच सगळं काही आलं. हा विषय पुन्हा नव्याने मांडायचा म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आणण्यासारखे आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण खरंच आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःवर, आयुष्यावर प्रेम करायचं पार विसरून गेलाय. आपण का जगतोय ? या व्याधीतून आपल्या विवंचनेत गुरफटून गेल्याने स्वतःवर प्रेम करायला फुरसत कुठंय…!

माणूस स्वप्नाळू असल्याने त्याचा आयुष्याचा प्रवास हा अधिक उत्साही, आशावादी आणि सप्तरंगी झाला असावा असं मी मानतो. सुख-दुःखाचे क्षण पावलोपावली त्याला भेटत असले तरी रमणे आणि त्यातून सहजच बाहेर पडणे या मनोभूमिका त्याला त्याचा जीवनप्रवास अधिक उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक झाला आहे. जीवन अधिक आनंद देणारे बनविण्यासाठी फक्त त्याला अशक्य ते शक्य होईल हा विश्वास निर्माण करावा लागतो. हा विश्वासच त्याचे आयुष्य अधिक गतिमान करत असतो. त्यासाठीच त्याने स्वतःच्या प्रेमात पडणे गरजेचे असते. एकदा का तो स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडाला की मग तो जगण्यावर हजारदा प्रेम करायला लागतो. त्याच्या आयुष्य भ्रमंतीसाठीच परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे. त्याला आनंदी ठेवण्यासाठीच हा निसर्ग बनवला आहे. अन हो…..एकट्याने सुरू केलेल्या त्याच्या जीवनप्रवासात त्याला प्रत्येक टप्प्यावर सोबत करणारी अनेक नाती जोडलेली आहेत. या संपूर्ण प्रवासात त्याला नियंत्रित करणारी एक अदृश्य शक्ती ‘नियती’ कायम त्याच्या सोबत असते. या नियतीनेच जीवनप्रवासाची आखणी केलेली असते. म्हणून तर माणूस नियतीने आखून दिलेल्या नियोजनाप्रमाणे जीवनप्रवास सुरू ठेवतो. नियतीने दिलेल्या सुखाने जसा तो हर्षभरीत होतो तसाच तो नियतीने दिलेलं दुःख देखील पचवतो. त्याचं फक्त नियतीकडे एकच मागणं असतं…. हमने भी तेरे हर एक गम को गलेसे लगाया है…है ना, ये जिंदगी गले लगा ले…..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा