भारतात ‘अभिव्यक्ती मर्यादेचा’ कायदा आणावा का ?

If there is no control over speech than behavior, there is a higher possibility of ‘argument’. ‘controversies’ flare up in society only because of people who talk sallowly on sensitive issues, should the government introduse a new ‘limitation of expression’ law to curb these shallow speakers in time ? Because lately only the shallow speakers in the political sphere are threatening the peace of the society by making controversial statemants.

वागण्या पेक्षाही बोलण्यावर नियंत्रण नसेल तर ‘वाद’ वाढण्याचीच शक्यता जास्त असते. संवेदनशील विषयावर उथळपणे बोलणाऱ्या लोकांमुळेच समाजात ‘वाद’ चिघळतात . या उथळ वक्त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी सरकारने नवा ‘अभिव्यक्ती मर्यादेचा’ कायदा आणावा का ? कारण अलीकडे राजकीय क्षेत्रातील उथळ वक्तेच वादग्रस्त विधाने करून समाजातील शांततेला धोका निर्माण करत आहेत?

मराठी भाषेत एक म्हण आहे ‘बोल बोल नाऱ्या, धोतर गेलं वाऱ्या’. थोडक्यात बिनबुडाचे म्हणजेच कोणताही आधार नसलेले आणि अतर्क्य अशी विधाने सार्वजनिक ठिकाणी करून स्वतःचेच गुंडाळलेले वस्त्र वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या हाती द्यायचे. सध्या विषयासाठी हा एव्हढाच अर्थ आपल्याला पुरेसा आहे. मागे कधीतरी घडून गेलेल्या परिस्थितीजन्य घटनेचे अर्धवट उकल करणारे कच्चे दुवे ‘दंगोबा’च्या पोतडीतून गोळा करायचे अन आपल्या प्रवाही मुखातून (विखारी रसायनयुक्त गटार) समाजात पसरवायचे हा सध्या स्वतःला सामाजिक कळवळा असल्याचे भासविणाऱ्या तथाकथित विद्वानांचे प्रमुख काम बनले आहे. मग या विखाराला ‘हवा’ देण्याचे काम सोशल मीडियावर वळवळणारे त्यांचे अनेक समर्थक ‘विषाणू’ करतात. या प्रकारासाठी भारतात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही प्राचीन आणि अर्वाचीन भारताचे संशोधन केंद्र म्हणून मान्यता पावले आहे.

आपल्याला लहानपणापासून शिक्षकांनी, घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी एक संस्कार आवर्जून केलेला असतो….शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा….पण हा संस्कारच आपण विसरत चाललोय. याउलट कायमचा अडगळीत टाकल्या जाणारा पसारा दिवाणखान्यात सजवून ठेवण्याच्या ‘अँटिक’ प्रकारासारखा कायमचे फेकून देण्याच्या लायकीचे ‘शब्द’ आपण आपल्या जिभेवर सजवून ठेवू लागलो आहोत. मग या सजविलेल्या शब्दांना लोकांसमोर प्रदर्शित करण्यावरच बंदी घातली तर….आपल्या शब्दांचं जगच जागच्या जागी थिजेल या भीतीने आपण कायम या शब्दांना अधिक स्फोटक परिस्थितीची ‘ऊब’ देण्याचे काम करू लागलोय. पूर्वी सौंदर्य अभिप्रेत असणारे शब्द आपल्या मुखातून येत असल्याने एकमेकांबद्दलचा गोडवा तर टिकतच होता, याशिवाय भाषेची श्रीमंती, संस्कार आणि मुख्य म्हणजे तुमची सभ्यता जगाला तुमच्यापुढे नतमस्तक व्हायला लावत होती. आजकाल ‘भ’ या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांना जास्त किंमत दिल्याने भाषेचा आणि सभ्यतेचा ‘भकारांत’ होवू लागला आहे. काय खरं आणि काय खोटं हे सांगताना वर्तमानात ते समाजाच्या कितपत फायद्याचे ठरेल याचा कसलाही ‘पोच’ न ठेवता सध्याचे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्नातक आणि संशोधक आपली ‘गरळ’ ओकण्याचे काम करत आहेत.

समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करण्यासाठी आवाजी गलिच्छ आणि अवमानकारक शब्दांचा भडीमार केला की आपण सांगतो तेच ‘सत्य’ असल्याचा आभास नेहमी ‘शब्दासूर’ करत असतात. कॅन्सरच्या विषाणू प्रमाणेच हे ‘शब्दासूर’ माणसाच्या शरीरात ‘इनबिल्ट’ असतात. माणूस सोज्वळतेचे वस्त्र फेकून जेंव्हा ‘नागडा’ होतो तेंव्हा हा ‘शब्दासूर’ शरीरातील ग्रंथीमधून मेंदूचा आदेश झुगारून जिभेवर येतो. मग तो जे काही ‘तांडव’ करतो ते कुणाच्याच भल्याचे नसते. एकदा का व्यासपीठ मिळाले की ओकण्याची जी ‘सुरसुरी’ किंवा ‘खाज’ सुटते, ही अवस्था म्हणजे ‘शब्दासूर’ जिभेवर येण्याची प्रथमावस्था असते. आजकाल जात-धर्म, सामाजिक संघर्ष यापासून ते राजकीय विषय आणि सामाजिक समतोल राखणाऱ्या विषयापर्यंत आपली मते विखारी भाषेतून मांडण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. सुरुवातीला सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे विषय पुढे चालून व्यक्तिगत पातळीवर हीन दर्जाची टीका करणारे वादाचे मुद्दे बनून जातात. आणि हे सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांचे प्रवक्ते म्हणून ओळख ठसविणाऱ्या तथाकथित वक्त्यांकडून केले जाते. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद मिळणाऱ्या या देशात इतर देशांपेक्षा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला’ अधिक मुक्त वावर आहे. कदाचित मिळणाऱ्या या सवलतीचा गैरफायदा घेतला जात का ? याचा गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण भारत हा नुसताच लोकशाहीवादी देश नाही तर तो बहुधर्मीय,बहुभाषिक आणि अनेक विचारधारेचे उगमस्थान असलेला प्रदेश आहे. तेंव्हा विविधतेने नटलेल्या या देशाचे सौंदर्य आणि भवितव्य अबाधित ठेवायचे असेल तर अमर्याद असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे. म्हणजे निदान आपला आवाका नसताना, लायकी नसताना दिवसरात्र गरळ ओकणाऱ्या गटार तोंडांना पायबंद बसेल. तूर्त एव्हढेच…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

4

)

  1. gosavimanik123

    सध्याची परिस्थिती पाहता असे वाटते की
    जागोजागी “संस्कार” वर्ग उघडावे लागतील
    😀😀✍️✍️👌👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      माणिकराव, पण उघडलेले संस्कारवर्ग देखील ‘संस्कारित’ राहतील का ? हे पहावे लागेल. 🤣🤣

      Like

  2. newsintercontinental.com

    हे स्वातंत्र्य हिरावून घेताना दबल्या पावलांनी हुकूमशाही येऊन उरलेसुरले स्वातंत्र्य कधी हिरावेल सांगता येत नाही. एका हुकूमशाहीतून कसेबसे वाचलो आहोत. दुसर्या फसव्या लोकशाहीत जगत आहोत. त्यात नवीन भर कशाला

    Liked by 1 person

  3. Nagesh Dharne

    हो, गरजेच आहे

    Liked by 1 person