What is the most expensive thing we have become in the present time of stress and inflation ? So that thing is happiness….Has happiness almost been banished from all of our lives ? We are living life to feel like this. Has happiness really been banished from our lives ? Or do we think that because everyone’s definition of happiness is different ? Or do we not enjoy moments of happiness ? Why should the other person feel the same thing that we think we are getting “joy” of ?
सध्याच्या धकाधकीच्या आणि महागाईच्या काळात आपण सगळ्यात जास्त महाग कोणत्या गोष्टीला झालो आहोत ? तर ती गोष्ट म्हणजे आनंद…..आपल्या सर्वांच्याच जीवनातून आनंद जवळपास हद्दपार झाला आहे की काय ? असं वाटण्यासारखं आयुष्य आपण जगत आहोत. खरंच आपल्या आयुष्यातून आनंद हद्दपार झाला आहे का ? की प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्याने आपल्याला असं वाटतंय का ? किंवा आपल्याला आनंदाचे क्षण उपभोगताच येत नाहीत का ? आपल्याला ज्या गोष्टीत ‘आनंद’ मिळतोय असं वाटतं त्याच गोष्टीची समोरच्याला ‘असूया’ का वाटत असावी ?

एखाद्याने बावळटपणा केला की आपल्याकडे एक प्रचलित वाक्यप्रयोग आहे, ब्रह्मदेव ‘अक्कल’ वाटत होते तेंव्हा तू ‘चाळणी’ घेवून गेला होतास का ? असं चरफडत विचारून त्याच्या बावळटपणाचा समाचार घेत असतो. कुठल्याही गोष्टीत अतिचिकित्सक राहिल्याने देखील सहजतेने मिळणाऱ्या आनंदाला आपण मुकतो. आपण ‘आनंद’ साजरा करायला देखील मुहूर्त शोधतो. चतुरस्त्र, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या स्व. पु. ल.देशपांडे यांच्या मते तर आनंदाचा क्षण हाच एक मुहूर्त असतो. पण आपण विश्वास ठेवतो का ? समजा अमावस्येच्या रात्री शुक्रतारा, सप्तर्षी किंवा टपोऱ्या चांदण्या दिसल्या तरी गडद काळोखातील त्या उजेडफुलांच्या उमलण्याचा आनंद आपण साजरा करत नाही … का ? तर अमावस्येचा अशुभ काळ आहे.

माझ्या परिचयातील एक ज्येष्ठ नागरिक अलीकडच्या काळात माझे चांगले मित्र बनलेत. सरकारी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतलेले हे सद्गृहस्थ आर्थिक चिंता नसल्याने म्हणा किंवा व्यवस्थित नियोजनबद्ध जीवनशैलीमुळे म्हणा म्हातारपण अगदी तरुणाईच्या जोशात ‘एन्जॉय’ करतात. मला त्यांचा फार हेवा वाटू लागलाय. दिवसभरात किमान पाच नवीन लोकांशी संवाद साधायचा हे त्यांचे सध्याचे ‘मिशन’ आहे. ‘आपल्याला भेटून फार आनंद झाला’ वाक्याने सुरुवात करत ते अनोळखी माणसाशी सलगी वाढवतात अन गप्पांचा ‘उत्सव’ साजरा करतात. आपल्या गोंधळलेल्या अवस्थेवर तेच लगेच हसून खुलासेवार स्पष्ट करतात….रिकामा वेळ घालवायचा कसा ? यावर माझ्यापरीने शोधलेला हा उपाय आहे. जास्त खर्चिक नाही पण आनंदाची अमर्याद वसुली करून देणारा आहे. या महिन्याची पेन्शन घेतली, पण पुढच्या महिन्याची पेन्शन आपल्याच हातात पडेल की नाही याची शाश्वती नाही. पुढच्या सेकंदाला आपल्यापुढे काय मांडून ठेवलंय हेच आपल्याला माहीत नसते एव्हढं अस्थिर आणि अशाश्वत जीवन आपण निवृत्तीपर्यंत जगलोच की, आता फक्त आनंदासाठी जगायचं. बघू किती दिवस तो मला सहन करतोय असं म्हणून मनसोक्त, निर्व्याज हसणाऱ्या त्या ज्येष्ठाची अलीकडे मला ‘असूया’ वाटते. एव्हढं कसं जमतं बुवा….स्मशानात आगावू आरक्षण करण्याचं वय, त्यामुळे हा माणूस ‘मुखवटा’ तर घालून जगणार नाही. मग हा खरंच ‘आनंद’ मिळवत जगतोय का ? आपण किती खोटं जगतो….कुणी विचारलं, ‘कसा आहेस ?’ तर लगेच ‘एकदम मजेत’ असं उत्तर बिनधास्त समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर फेकून आपण लगेच मोकळे होतो. त्यावेळी खरंच आपण मजेत असतो का ? बरं आपण कसेही असुत समोरच्या व्यक्तीला हे विचारण्याचा भोचकपणा करून कसला आनंद मिळतो ? आपण सगळेच ‘मजेत’चा मुखवटा घालून जगत असतो. बरं रडून-भेकून तरी काय फायदा असतो ? दुसऱ्यांसमोर आपलं ‘रडगाणं’ गायलं म्हणून आपल्या परिस्थितीत काही बदल होणार आहे का ? उलट समोरचा व्यक्ती आपलं रडगाणं ऐकून मनोमन सुखावतो. कारण आपल्यापेक्षा जास्त आनंदाला पारखा झालेला माणूस त्याला सापडलेला असतो. शेवटी काय ? तर दुसऱ्यापेक्षा आपलं बरं चाललंय, ही समजूत म्हणजेच ‘आनंद’ अशी व्याख्या सध्या रूढ झालीय.

आपण आपल्या कामाच्या घाईत आहोत आणि घराबाहेर पडल्या-पडल्या कुणीतरी आपल्याला हटकतो….बाहेर चाललात वाटतं ? त्याच्या ह्या असल्या भोचकपणामुळे मस्तकात एक सणक निर्माण होते. एकवेळ रस्त्याने जाताना मांजर आडवी गेली तरी चटकन हातात दगड येतो अन तो भिरकावल्या देखील जातो, ही क्रिया सहज घडते. पण परिचिताने हटकले तर चरफडण्या शिवाय काही गत्यंतरच उरत नाही. कारण तो हटकतोय हाच आपण आपला समज करून घेतलेला असतो. पण तो आपलेपणाने जिव्हाळ्यापोटी विचारतोय हा जर आपण आपला समज करून घेतला तर क्षणात येणाऱ्या रागावरही नियंत्रण ठेवता येते आणि माणुसकीचा ओलावाही जपता येतो. शेवटी माणसाला आयुष्य काही ठरवून जगता येत नाही. आपण शाळेचं ठरवलेलं ‘वेळापत्रक’ तरी कुठं कसोशीने पाळलेलं असतं. मग आयुष्याचं ‘वेळापत्रक’ कसं पाळलं जाईल ? मी नियोजनबद्ध जगतो ही फक्त फुशारकी असू शकते. त्यामुळे आनंदाचं देखील तसंच आहे. आता आनंदाचा तास आहे असं वेळापत्रक आपण नाही बनवू शकत. पण येईल तो क्षण ‘आनंदी’ मात्र बनवू शकतो. म्हणून तर माणसाला नियतीचा ‘विदूषक’ म्हणतात. शेवटी काय तर आनंद तुमच्या नशिबात किंवा कुंडलीत बसलेला ‘तेरावा’ ग्रह नाही की तो तुम्हाला शुभफळे देईल. आनंद ही मानायची गोष्ट आहे. हे सांगताना मी खूप आनंदी आहे…तुमचं तुम्ही बघा बाबा…😍😍😍

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.