Just yesterday Lord Ganesha, the God of wisdom, has arrived in great excitement and joy. Now that Ganaraya is staying for ten days, religious rituals and traditional cultural activities will start from every household. Everyone tends to celebrate the festival with zeal to stay in the limelight throughout the year even till next year’s Ganesha Advent. Nowadays no action is complete without ‘Jealousy’. Man does not hesitate to be ‘Jealous’ even with the Lord himself.
कालच बुद्धीची देवता श्री गणेशाचे अगदी उत्साहात, जल्लोषात आगमन झाले आहे. आता गणरायाचा दहा दिवस मुक्काम असल्याने घराघरातून धार्मिक विधी आणि पारंपारिक पद्धतीच्या सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल सुरू होणार. पुढे वर्षभर अगदी पुढच्या वर्षीच्या गणेश आगमनापर्यंत चर्चेत राहण्यासाठी ईर्षेने उत्सव साजरा करण्याकडे सर्वांचा कल असतो. आजकाल कोणतीही कृती ही ‘ईर्षे’ शिवाय पूर्ण होतंच नाही. प्रत्यक्ष परमेश्वराशी देखील माणूस ‘ईर्षा’ करायला मागेपुढे पहात नाही.

विशेषतः सार्वजनिक उत्सवांमधून लक्ष वेधून घेत त्यातून स्वयंघोषित नेतृत्व तयार करण्याची अटकळ फार पूर्वीपासून केली जात आहे. जेंव्हा सार्वजनिक उत्सवातून बौद्धिक आणि संस्कारक्षम कार्यक्रम हळूहळू कमी होत गेले तेंव्हापासून सार्वजनिक उत्सव हे शक्तीप्रदर्शनाचे मुख्य व्यासपीठ बनू लागले. सध्या भारतात गणेशोत्सवाचा काळ आहे. तसेच वर्षभरावर लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुका येवून ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप बदलणे त्यापाठोपाठ त्याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयोग जाणीवपूर्वक करणे हे अपेक्षितच आहे. मुळातच जनजागृती हा सार्वजनिक उत्सवांचा पाया असल्याने निव्वळ धार्मिक विषय म्हणून सार्वजनिक उत्सवाचे मर्यादित स्वरूप कधीच नव्हते. त्यामुळेच प्रत्येक राज्यागणिक वेगवेगळ्या धार्मिक उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देतानाच त्याला सामाजिक आणि राजकीय व्यासपीठाचा आकार देण्याची खुली सूट दिल्या गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने आता फक्त देशच नाही तर जगभरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ केली आहे. याबरोबरच नेतृत्वाची संधी निर्माण करणारे एक नवे व्यासपीठ दिले आहे. त्यामुळे हा हिंदुधर्मीयांचा जरी सार्वजनिक उत्सव असला तरी इतर धर्मियांचा देखील या उत्सवातून लक्षणीय सहभाग वाढल्याचे दिसते. विद्येचा आणि कलेचा कारक असलेला श्रीगणेश आता राजकीय क्षेत्राचा देखील कारक देवता बनला आहे.

सार्वजनिक उत्सवाचे व्यासपीठ आता जनजागृती सोडून जनसंपर्कासाठी शक्तीप्रदर्शनाचे व्यासपीठ बनले आहे.जिथे शक्तीप्रदर्शनाचा विषय येतो तिथे ‘ईर्षा’ वाढीला लागणे क्रमप्राप्त आहे. सार्वजनिक व्यासपीठ असल्याने विविध विचारधारेचे प्रवाह याठिकाणी आपले प्रभुत्व दाखविण्यासाठी सहभागी व्हावेत हा जरी शुद्ध हेतू असला तरी ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या न्यायाने बाहुबली या व्यासपीठांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवतात. शेवटी उत्सव साजरा करताना जी उधळपट्टी केली जाते त्यामागचे अर्थकारण पेलणे हे सर्वसामान्यांना कधीच शक्य होणार नसते. त्यामुळेच समाजीकस्तरावर आपल्या विशेष गुणवैशिष्ट्यामुळे विशेष बदनाम झालेले ‘बाहुबली’ किंवा धनिक मंडळी देखील आपल्या धनाशक्तीच्या जोरावर या व्यासपीठाचा चक्रव्यूह तयार करतात. या चक्रव्यूहात प्रवेश तर सहजगत्या होवू शकतो, पण यातून चारित्र्य संपन्नतेचे प्रमाणपत्र घेवून बाहेर पडणे युवाशक्तीसाठी तितकेच अवघड आहे. कारण या धनिक किंवा बाहुबली लोकांच्या प्रभावाखाली येतो तो युवावर्ग. श्रीमंतीचे असणारे आकर्षण हे त्यामागचे प्रमुख कारण असते. एकदा का हे युवा त्या बाहुबलीच्या चक्रव्यूहात आतपर्यंत जावून अडकतात, तेंव्हा परतीचे सर्व दरवाजे बंद झालेले असतात. अशा स्थितीत तो चक्रव्यूह त्यांना गिळतो किंवा बाहेर पडण्याच्या प्रयत्नात युवा स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. प्रत्येक गाव, नगर, शहर, महानगरातील पोलीस ठाण्यात जावून युवा गुन्हेगारांची यादी चाळली तर मी सांगतोय त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल.

शेवटी फाटक्या आर्थिक स्तरावर जगणाऱ्या युवा वर्गामध्ये सार्वजनिक व्यासपीठाच्या स्पर्शाने दुष्परिणाम होतो का ? कुठलीही पात्रता नसताना त्यांच्यामध्ये एव्हढी ‘ईर्षा’ कशी निर्माण होते ? थोडंसं विस्ताराने बघुयात म्हणजे मला जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला नक्की पटेल. अर्धवट शिक्षण झालेल्या मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील युवावर्गाला केवळ श्रीमंती आणि सहजतेने पैसा मिळण्याच्या चोरवाटांचे अधिक आकर्षण असते. ते साहजिक देखील आहे. कारण चांगल्या वेतनाची नोकरी ते शिक्षण अर्धवट असल्याने मिळवू शकत नाहीत. व्यापार, व्यवसाय करायला त्यांच्याजवळ पैसा नसतो. शिवाय बापजाद्यांची देखील एव्हढी कमाई नसते की ते आपल्या अर्धवट शिकलेल्या मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखों रुपये देवू शकतील. अश्या परिस्थितीत ही मुले सार्वजनिक उत्सवाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ ईझीमनीच्या आकर्षणापोटी ‘बाहुबली’च्या चक्रव्यूहात अडकतात. सार्वजनिक व्यासपीठावरून लोकांचे लक्ष वेधून घेणे हा सर्वात सोपा मार्ग असतो, बरं कुठल्या तरी बाहुबलीच्या धनशक्तीच्या जोरावर हे व्यासपीठ उभे राहिलेले असते. त्यामुळे दुसऱ्याच्या लग्नात आपली मुंज करून घेण्याचा हा प्रकार म्हणजेच नेतृत्वाचा सगळ्यात सोपा आणि बिनखर्चाचा मार्ग मिळतोय म्हंटल्यावर या अर्धशिक्षित तरुणांची बुद्धी फिरणार नाही तर काय होणार ? पण एकाच व्यासपीठाचा आधार घेऊन अनेकांना नेतृत्वाची संधी मिळवायची असते. वर्चस्वाची भावना जिथे जन्म घेते तिथेच ‘ईर्षेचा’ जन्म होतो. त्यामुळेच आजकाल सार्वजनिक उत्सवाची व्यासपीठे ही ईर्षेची केंद्रे बनली आहेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to gosavimanik123 उत्तर रद्द करा.