Does every age group want ‘solitude’ these days ? This can now become a social issue. Entertainment devices have also become monogamous. Although the theory that people are becoming single because of mobile phones is widely accepted, it is also a half-truth. Basically, the thought that I want ‘space’ for myself makes a person lonely even in a crowd, so if this desired solitude is given an honorable place in the ‘family’ system, all the members of the family will remain together under one roof, even if it is silent.
आजकाल सगळ्याच वयोगटाला ‘एकांत’ हवा आहे का ? हा आता सामाजिक प्रश्न होवू शकतो. मनोरंजनाची साधने देखील एकलवासी झाली आहेत. मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी होत आहेत हा सिध्दांत जरी सर्वमान्य असला, तरी ते पण एक अर्धसत्यच आहे. मुळात मला स्वतःला ‘स्पेस’ हवी आहे, हा विचार माणसाला गर्दीतही माणसाला एकलकोंडा बनवतोय. त्यामुळे या हव्या असणाऱ्या एकांतवासाला ‘कुटुंब’ व्यवस्थेत सन्मानजनक स्थान दिले तरच निःशब्द का होईना , एकाच छताखाली कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र दिसत तरी राहतील.

भारतात मोबाईल १९९५ च्या सुमारास सर्वांच्या हाती आला. संपर्काचे साधन म्हणून मोबाईलचे सर्वसामान्यांमधून जोरात स्वागत देखील झाले. ३१ जुलै १९९५ रोजी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यामध्ये पहिले संभाषण होत मोबाईलने भारतीय जनमाणसांच्या जीवनात प्रवेश केला. संपर्कातून प्रगतीचा वेग वाढविणारे साधन म्हणून मोबाईलला काही दिवसातच कुटुंब सदस्य म्हणून अनिवार्यतेचे स्थान मिळाले. मोबाईलचा कुटुंबात प्रवेश होईपर्यंत कुटुंब हे गजबजलेलं असायचं. कुटुंबातील प्रत्येकजण हा त्याच्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतानाच इतर सदस्यांशी सुखसंवाद साधत असायचा. रात्री जेवणं झाल्यानंतर सर्व सदस्य एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधायचे. दिवसभरातील घडामोडींची इतरांना माहिती द्यायचे. कुटुंबा व्यतिरिक्त पै-पाहुणे सोडले तर घरातील गप्पांमध्ये बाहेरच्या परिचितांची क्वचितच उल्लेख व्हायचे. एकूणच घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासोबत असलेले नाते अधिक दृढ व्हायचे.

एक कुटुंब म्हणजे अख्खं गजबजलेलं गाव असायचं. लहानांना कोणतीही समस्या भेडसावयाला लागली तर रात्री जेवणं झाल्यानंतर चर्चेतून ही समस्या सोडविली जायची. निदान आपल्या समस्येवर वडीलधाऱ्या मंडळींनी चर्चा तरी केली या विचारातून कुटुंबातील एकजिनसीपणा वाढायचा. त्यावेळीही संपर्कासाठी आवश्यक म्हणून काही कुटुंबातून टेलिफोनची सुविधा असायची. पण फोनचा वापर हा फक्त कॉल घेणे आणि करणे यासाठीच असल्याने चोवीस तास माणूस त्यात गुंतून पडलेला नसायचा. शिवाय फोनची जागा ठरलेली असायची. तो सोबत घेवून हिंडता फिरता येत नव्हते. पण मोबाईलचं तसं नाही. खिश्यात मावणारा मोबाईल फक्त संपर्काचे माध्यम म्हणून नाही तर माहिती,मनोरंजन आणि ज्ञानाचा खजिनाच निघाला. या लालसेने आपोआपच कुटुंबातील असलेला एकमेकांचा संवाद कमी होत गेला. रोजची नियमित चर्चा थांबून घरात महत्वाच्या विषयांवरच चर्चा व्हायला लागल्या. यामध्ये ज्येष्ठांकडे आपले मत मांडायची संधी लहानांना कमी प्रमाणात मिळू लागली. संवाद कमी होवू लागल्यानेच ‘मला काहीतरी सांगायचं आहे’ हा न्यूनगंड मोठा होत गेला. त्यातूनच सुरक्षिततेपोटी ‘स्पेस’ हवी ही मागणी पुढे आली. फार नाही पण गेल्या पंधरा वर्षांपूर्वी ‘स्वतःची स्पेस’ ही कन्सेप्ट काय साधा शब्द देखील उच्चारला जात नसायचा.

मोबाईलची एक खासियत आहे. तुम्ही ज्या पद्धतीच्या पोस्ट सर्फिंग करता, लाईक करता, त्या पद्धतीच्या पोस्टचा, माहितीचा विस्फोट ते मोठ्या प्रमाणात करून तुम्हाला गुंतवून ठेवते. तुमच्या आवडीला फुलविताना त्याने तुमच्या मेंदूचा कधी ताबा घेतला हे देखील कळत नाही. क्रिया-प्रतिक्रिया तुम्हीच करायच्या आहेत. तो तुम्हाला फक्त व्यक्त होण्यासाठी ‘स्पेस’ देतोय….हीच स्पेस आपल्या घरातल्या माणसांकडून आपल्याला हवी असते. आपण ‘आत्मकेंद्रित’ होत फक्त मोबाईलचे बनून राहतो. हाच ‘फोबिया’ जगभरात वेगाने फोफावतोय. आर्टिफिशियल इंटिलीजन्सचा महाविस्फोट आता आपल्याला स्वमग्नतेची स्पेस मागतोय. सध्यातरी यावर ईलाज शोधायला आपणच तयार नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा