दीर्घ आणि फलदायी आयुष्यासाठी प्रत्येकाला माफ करा…!

The secret to a long and fruitful life is to forgive everyone before you go to sleep. I find this idea ideal. Interestingly, this concept was proposed by Bernard Baruch, who became famous as a financier and political consultant of the American Government during the Second World War. Perhaps the American people who experienced the death toll of the two World War’s were taught to end hostilities and ‘ forgive’ others.

दीर्घ आणि फलदायी आयुष्याचे रहस्य म्हणजे आपण झोपण्यापूर्वी प्रत्येकाला सर्व काही माफ करणे. ही कल्पनाच मला खूप चांगली वाटली. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सरकारचे वित्तपुरवठादार आणि राजकीय सल्लागार म्हणून प्रसिद्ध झालेल्या बर्नार्ड बरुच यांनी मांडलेली ही संकल्पना. कदाचित दोन महायुध्दांमध्ये मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या अमेरिकन लोकांना वैरभाव संपवित इतरांना ‘माफ’ करण्याची शिकवण मानवली असावी.

माणूस हा चुकांचा पुतळा आहे हे जरी तत्वतः मान्य केले तरी आपण केलेली चूक मान्य करीत त्याची जबाबदारी स्वीकारून चुकांचे परिमार्जन करणे हा सुधारणा करण्याचा टप्पा समाजनियमांनी घालून दिलेला आहे. मात्र हा टप्पा डावलून किंवा ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात एखादा जेंव्हा आपल्याकडून झालेल्या चुका न स्विकारता उलटपक्षी त्या घडलेल्या चुकांसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवतो किंवा कांगावा करतो अशावेळी दोन गटात वैरत्वाची भावना वाढीस लागते. हे वैरत्वाचे ‘जहर’ दोन व्यक्तिमधून त्यांच्या कुटुंबात मग हळूहळू दोन गटात आणि पुढे दोन समाजात पसरते. आज समाजात याच घटना जिकडेतिकडे पहायला मिळतात.

गर्दीला चेहरा नसतो तसेच गर्दीला जात, धर्म, पंथ किंवा कोणत्याही विचारधारेचे सोयरसुतक नसते. कारण गर्दी म्हणजे असंवेदनशील आणि निर्बुद्ध, असभ्य माणसांचा ‘जमाव’ असतो. हा जमाव नियंत्रित करणारी एक अदृश्य शक्ती असते. पण ती घटनास्थळी कधीच सापडत नाही. बर्नार्ड बारुच म्हणतो की, गर्दीच्या मागे कधीही जाऊ नकात. ते तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी नक्कीच मैदानात उतरलेले नसतात. तुमच्यासाठी आवाज उठविण्याचा ‘मुखवटा’ त्यांनी आपल्या विकृत चेहऱ्यावर चढवलेला असतो. तुम्हाला भावनिक ‘साद’ देत रस्त्यावर उतरविण्यामागे त्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो. हे मी नवीन काहीच लिहीत नाहीय. तुम्हाला हे सगळं माहीत आहे. पण मग मला गर्दीत माझ्या परिचयाचे हात-पाय का दिसतात…? माझ्याच ओळखीच्या स्टोअरमधून मिळणाऱ्या सोडा वॉटरच्या बाटल्या भिरकावलेल्या मला का दिसतात…? तो दुसऱ्याच्या धर्माची, देवाची निर्भत्सना करणारा ‘आवाज’ मला परिचयाचा का वाटतो…? त्याच आवाजाने काहीकाळा पूर्वी मला मैत्रीसाठी ‘हाक’ दिली होती. हे सगळे प्रश्न फक्त माझ्यासाठी नाहीत…..तुम्हा सर्वांचा देखील हाच अनुभव आहे. कारण हा अंतरात्म्याचा आवाज आहे. मग का जाता गर्दीच्या मागे…? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनालाच तुम्हाला द्यावे लागणार आहे. आपल्या ‘अवतीभवती’ जर वैरत्व पसरणार असेल तर ते थोपविण्यासाठी बर्नार्ड बारुच म्हणतो तोच उपाय आपली उपयुक्तता सिद्ध करणारा ठरेल. कारण ज्यांनी हिरोशिमा-नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकून त्या शहरांचे अस्तित्वच मिटवण्याची अक्षम्य चूक केली होती. त्याच अमेरिकेचा तत्कालीन राजकीय सल्लागार मरण्यापूर्वी हे सांगून गेला….रोज भेटणाऱ्या विरोधकांना झोपण्यापूर्वी क्षमा करा…..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. gosavimanik123

    दया, क्षमा आणि शांती
    ✍️✍️👌👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद माणिक 🙏🏻🙏🏻

      Like