What’s a topic or issue about which you’ve changed your mind?
What topic or issue have you changed your mind about ? Such a question is not usually asked in Bharat (India). Because no matter how much we sing the sweetness of free liberty, we can only remain socially oriented if we keep our free thoughts and actions in a safe closed compartment. Call it our problem or call it cowardice…. The feeling that we are outnumbered by the majority is now creating a sense of inferiority in us. There are only two options left, either to deal directly with this negative thinking or to change our ways.
असा कोणता विषय किंवा समस्या आहे त्याबद्दल तुम्ही तुमचा विचार बदलला आहे ? असा प्रश्न सहसा भारतात तरी विचारला जात नाही. कारण मुक्त स्वातंत्र्याचे आम्ही कितीही गोडवे गात असलो तरी आम्ही आमचे मुक्त विचार आणि आचरण एका सुरक्षित बंद कप्प्यात ठेवलं तरच आम्ही समाजाभिमुख राहू शकतो. ही आमची अडचण म्हणा किंवा भित्रेपणा समजा….आम्ही संख्याबळाने इतर बहुसंख्यकांपेक्षा कमीच आहोत ही भावना आता आमच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करत आहे. एकतर या नकारात्मक विचाराशी सरळ-सरळ दोन हात करावे किंवा आपण आपला मार्गच बदलावा हे दोनच मार्ग आता शिल्लक आहेत.

विषय सुरू होतो तो व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला आलेल्या अनुभवातून. पण हाच अनुभव जर सामाजीकस्तर दाखवणारा किंवा तुमच्या जातसमूहाला निर्देशित करणारा असेल तर…? अशावेळी समाजाविषयी आपली परखड मत मांडू शकता. विशेषतः आपल्याच जातसमूहाने अशा परिस्थितीत नेमकी कोणती भूमिका घ्यावी ? ज्यामुळे जात बांधवांचे सामाजिक खच्चीकरण न होता उलट त्याला त्याच्या व्यक्तिगत विकासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उचित भूमिका मांडणे म्हणजे जातीयवादी ठरू शकत नाही. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. हे असे क्षेत्र आहे जिथे बुद्धिवाद्यांचे कायमच प्राबल्य राहिलेले आहे. लेखणी हाती घेतलेला हा धर्मनिरपेक्ष आणि जातीयवादापासून चारहात दूर असतो हा या क्षेत्रातील गेल्या कित्येक वर्षांपासून कुरवाळल्या गेलेला ‘भ्रमित’ विश्वास आहे. मुळातच धर्म, जात आणि प्रांतीय विचारधारेत विभागलेले गेलेले बुद्धिवादी असंच या क्षेत्राचं स्वरूप आहे. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही आल्यावर तुम्हाला देखील हा वैचारिक ‘नग्नावतार’ अनुभवायला नक्कीच मिळतो. अर्थात तुम्हाला लगेचच ह्या अवताराचे दर्शन होईल असे नाही. तुमची लेखनशैली, वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद वाढला म्हणजे थोडक्यात तुम्ही पत्रकार म्हणून नजरेत येवू लागलात की बुद्धिवादी गटांची तुम्हाला आपल्या कंपूत खेचण्याची स्पर्धा सुरू होते. याचवेळी पहिल्यांदाच तुम्ही ज्या जातीमध्ये जन्म घेतलेला असतो, त्या जातीचा पत्रकार म्हणून तुमच्याकडे पहायला सुरुवात होते. असे विविध जातींचे गट पत्रकारितेमध्ये गेल्या अनेक दशकांपासून आपला ऑक्टोपसी विळखा घालून बसलेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात फक्त ब्राह्मण मिरासदारी चालते हा होणारा आरोप निखालस खोटा आहे. अशा वातावरणात बौद्धिक खच्चीकरणाचे येणारे अनुभव किती विदारक असू शकतात हे सांगण्यासाठी स्वतंत्र लेख पुन्हा कधीतरी लिहीनच… तूर्त मी माझ्या जात बांधवांना (त्यांचा रोष पत्करून देखील) सल्ला देवू शकतो, त्यावरून मी जातीयवादी ठरणार असेन तर त्यालाही माझी आजमितीला हरकत नाही. अलीकडच्या काळात म्हणजे जेंव्हापासून भारतीय जनता पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे तेंव्हापासून ‘पेशवाई’ म्हणून रोज सोशल मीडियावर ब्राह्मण जातीचा उद्धार सुरू झाला. ज्या भाजपाला ब्राह्मणांचा राजकीय पक्ष म्हणून संबोधले जाते तो पक्ष खरोखरच ब्राह्मणी पक्ष आहे का ? सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा जातसमूह संख्येने आणि ताकदीने दुर्बल असणं हा त्या जात समूहाचा दोष नसतो. पण अस्तित्वाच्या अपरिहार्यतेमुळे त्याला राजकीय भूमिका ठरवावी लागते. असे सर्वच जात समूह आहेत जे आपआपली राजकीय भूमिका मांडणाऱ्या राजकीय शक्तींबरोबर जोडल्या गेले आहेत. अशास्थितीत ब्राह्मण समाजाची राजकीय भूमिका असणं हे जरी गैर नसले तरी सद्यस्थितीत त्या भूमिकेचा जर समाज बांधवांना फायदा होणार नसेल तर ही भूमिका बाळगण्याचे ओझे कशासाठी ? मुळातच भाजप असो अथवा अन्य राजकीय पक्ष असोत जर तुम्हाला त्यांच्याकडून काही मिळवायचं नसेल तर ब्राह्मण समाजाने आपली राजकीय भूमिका मांडण्यात आपला शक्तिपात का करावा ?

क्षात्र धर्म अंगिकारून शस्त्र हातात घेवुन महान विजेता होण्याचे स्वप्न ब्राह्मण वीरांनी साकार केल्याचे अनेक दाखले पुराणात आणि इतिहासात आढळतात. केवळ ब्राह्मण विरोध म्हणूनच या दाखल्यांची वेळोवेळी जर इतर जातीय आणि धर्मीय बांधवांकडून मोडतोड केली जाणार असेल तर ब्राह्मणांनी केवळ त्यांना विरोध करण्यात आपली शक्ती खर्ची घालावी का ? एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा ‘विश्वास’ आवश्यक आहे. अन हा विश्वास ब्राह्मण समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये जन्मजात असतो-आहे आणि राहील. आम्हाला जर राजकीय सत्तेकडून फक्त ‘संरक्षण’ हवं असेल, कुठल्याही प्रकारचे ‘आरक्षण’ नको असेल तर त्यासाठी आपली आग्रही राजकीय भूमिका निदान सध्याच्या काळासाठी तरी पोषक ठरणार नाही. कुठलीही मागणी कितीही रास्त असली तरी संख्याबळाचा अभाव आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल तर ती मागणी कधीच फलद्रुप होत नसते. निदान लोकशाही प्रणाली ज्या देशांमध्ये आहे तिथे तरी हेच चित्र दिसते. मग सरकारकडून ‘संरक्षणाची’ हमी मिळवणारी मागणी देखील कशी पूर्ण होवू शकते ? रोज तुमच्या तोंडावर ब्राह्मणी म्हणून जरी उद्धार होत असला तरी तुम्ही ‘विशेष संरक्षण’ कायद्याची मागणी करू शकत नाही. मुळात अशा कायद्यांचा समाज एकत्रीकरणामध्ये तोटाच होत असतो. उलट इतर समाज त्याला एकटं ठेवतो. मुळातच बौद्धिक अधिष्ठान लाभलेल्या ब्राह्मण समाजाची ही गरजच नाही.

गांधी हत्येनंतर उसळलेल्या रोषात अनेक ब्राह्मण कुटुंबांची होरपळ झाली. खेडेगावातील ब्राह्मणांची घरे जाळल्या गेली. शेतीवाडी सोडून ब्राह्मणांना शहराचा आश्रय घ्यावा लागला. ब्राह्मण वर्ग ‘चाकरमानी’ म्हणून पुढे आला तो या घटनेनंतरच. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपले अस्तित्व राखण्यासाठी त्याला जबरी किंमत मोजावी लागली, हा अलीकडच्या काळातील घटनाक्रम आहे. याला कदाचित आजमितीला इतिहास म्हणता येणार नाही. पण ब्राह्मणांच्या भावी पिढ्यांसाठी तो काळ ‘इतिहास’ म्हणूनच स्मरणात राहील. तरी देखील ब्राह्मण समाजाने इतर समाजाचा रोष स्वीकारूनही आपल्या राष्ट्रभक्तिमध्ये कुठलाही कसूर ठेवला नाही. आजही स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काही मिळवू पाहणारा ब्राह्मण वर्ग आपल्या इतर समाजबांधवांवर आणि आपल्या देशावर तितकेच उत्कट प्रेम आणि निष्ठा ठेवून आहे. कारण त्याला हे माहीत आहे की, जे चंदन घासल्या जाते तेच देवाच्या कपाळी लावल्या जाते.

भारतीय राजकारणात संख्यात्मक दृष्टीने किती ब्राह्मण समाजाचे राजकीय नेते होते आणि सध्या आहेत ? बरं ह्या राजकीय नेत्यांनी फक्त ब्राह्मण समाजासाठी म्हणून किती योजना आणल्यात ? किंवा सरकारकडून समाजाचा विकास व्हावा याउद्देशाने काम केले आहे ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण म्हणून हे राजकीय नेते निवडणुकांमधून विजयी झाले आहेत का ? निदान महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात एकही गाव किंवा शहर असे सापडणार नाही जिथे फक्त ब्राह्मण समाजाचा संख्यात्मक वरचष्मा आहे. मग जर ते इतर समाजाच्या मतांवर निवडून येणार असतील तर ते आपली जन्मजात म्हणून ब्राह्मण समाजासाठी कसे योगदान देवू शकतील ? याबाबतीत मला नेहमीच ‘पारशी’ समाजाचे कौतुक वाटते. त्यांना तर स्वतःचा देश देखील राहिला नाही. शिवाय संख्यात्मक दृष्ट्या अतिशय दुर्बल असलेला हा समाज जिथे राहिला त्या भूमीशी ईमान राखून आपल्या मेहनतीने, चिकाटीने नुसताच स्थिरावला नाही तर त्या देशाच्या अर्थकारणाचा आधारस्तंभ बनला. आजच्या काळात स्पर्धा एव्हढी वाढलेली असताना घरागणिक एकजण विदेशात नोकरीच्या निमित्ताने अर्थार्जनासाठी स्वप्ने बघत असताना ब्राह्मण समाजातील युवाशक्तीने स्थानिक राजकारणाच्या चिखलफेकीत सहभागी व्हावे का ? सोशल मीडियावर रोज ब्राह्मण समाजाविषयी गरळ ओकणाऱ्या विद्वानांच्या पोस्टींना उत्तरे देत आपला वेळ वाया घालवावा का ? ही आपली आणि आपल्या समाजाची गरज आहे का ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to gosavimanik123 उत्तर रद्द करा.