What’s something you would attempt if you were guaranteed not to fail.
What would you try if you could guarantee you wouldn’t fail ? This question seems to be basically a question that shows the weakness of your work force. But this question of clarifying our limits is a question of positivity to protect us from the obstacles that come in our way. Because the person asking this question can definitely be someone who thinks positively about you, who is emotionally connected to you. The person standing against you will certainly not ask you this question. Eventually your dream of success becomes not just yours but the dream of many, at that time you feel that many forces have been lined up behind you in ‘visible’ and ‘invisible’ forms to make you successful.
आपण अयशस्वी होणार नाही याची हमी दिल्यास आपण काय प्रयत्न कराल ? हा प्रश्नच मुळात तुमच्या कार्यशक्तीची दुर्बलता दर्शविणारा प्रश्न वाटतो. मात्र वरकरणी आपल्या मर्यादा स्पष्ट करणारा हा प्रश्न आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपासून आपल्याला सुरक्षित ठेवण्याची सकारात्मकता दर्शविणारा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न विचारणारा नक्कीच तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करणारा, तुमच्याशी भावनिकतेने जोडलेला व्यक्तीच असू शकतो. तुमच्या विरोधात उभा असलेला व्यक्ती तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच विचारणार नाही. शेवटी तुम्ही यशस्वी व्हावे हे स्वप्न फक्त तुमच्या एकट्याचे न राहता अनेकांचे स्वप्न बनते, त्यावेळी तुम्ही यशस्वी व्हावे म्हणून तुमच्या बाजूने अनेक शक्ती ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ स्वरूपात तुमच्या पाठीशी उभारल्याचे तुम्हाला जाणवत असते.

आपण आपलं आयुष्य सर्वसामान्य म्हणून जगायचं की वेगळं काहीतरी असामान्य कर्तृत्वाने आपलं आयुष्य उजळवून टाकायचं हे खरं म्हणजे ठरवून होत नसतं. एक चांगला सुसंस्कारित किंवा शिक्षित माणूस घडविला जातो हे एकदम मान्य आहे. मात्र सुसंस्कारित किंवा शिक्षित होणे म्हणजे यशस्वी होणे असं तर अजिबात नसतं. कारण मला वाटतं की ‘यश’ म्हणजे आपण सातत्याने करत असलेल्या कामाला किंवा कृतीला अनेकांनी पसंत करत त्याचं अनुकरण केलं की त्याकरिता मिळणारं जे समर्थन असतं त्याला आपण ‘यश’ म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. नाहीतर एखाद्या परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालो म्हणजे आपण यशस्वी झालो असं जे म्हणतो ना ! ते म्हणजे यशस्वितेचे एखादे गणिती सूत्र मांडल्यासारखे वाटते. तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिलंय हे तुमची उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला वाटले म्हणून त्याने तुम्हाला त्या उत्तरासाठी ‘गुण’ दिले. तुमचा आणि त्याचा ‘होरा’ अचूक ठरला म्हणून आनंदोत्सव साजरा करणे ठीक आहे, पण म्हणून ते यश म्हणणे म्हणजे फार घाईचे वाटते. कारण यशाचा टप्पा अजून खूप पुढे असतो. तुम्ही जे काही आत्मसात करत असता त्याचा आपल्या जीवनात उपयोग करताना स्वतःसह अनेकांना त्याचा लाभ मिळवून देणे ही यशाची पहिली पायरी असते. स्वतःसह इतरांच्या कल्याणासाठी कमावलेली ‘ऊर्जा’ उपयोगात आणणे म्हणजेच यश मिळवणे. अशी जर यशाची व्याख्या आपण मनापासून स्वीकारली तर मग त्यासाठी आपण अधिक गंभीर होवू.

मिळालेल्या पसंतीची पावती ही प्रतिकात्मक म्हणून आपल्याला दिलेली असते. कारण ‘यश’ हे कुणा एकट्याचे नसते. यश हे नेहमीच एकत्रित झालेल्या वेगवेगळ्या शक्तींचे सर्वोत्तम सांघिक प्रदर्शन असते. त्या एकत्रित शक्तींचे प्रतीक म्हणून आपल्याला यशस्वी म्हणून पाहिले जात असते. त्यामुळे ‘मी मिळविले’ हा अहंकारच आपल्या मिळणाऱ्या ‘यशातील’ पहिला अडथळा असतो. आपल्या सभोवती जमणारी माणसे ही केवळ माझ्यामुळेच ओळखली जात आहेत, हा अहंकारच तुम्हाला यशापासून दूर नेत असतो. त्यामुळेच योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ तुम्हाला मिळाली की मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. सिने अभिनेता अनुपम खेर यांच्या मतानुसार आपण अपयशी ठरू ही तुमच्यामध्ये निर्माण होणारी भीतीच तुम्हाला यशापासून खूप दूर घेऊन जात असते

आपल्या स्वभावाची एक खास खोड असते. कोणतेही काम आपण आवेशात करायला घेतो खरे…. काही काळाने आपल्या लक्षात येते की, हे काम एकट्याने वेळेत पूर्ण केले जावू शकत नाही. मग अशावेळी आपल्याला इतरांनी मदत करावी असं मनातून वाटत असतं पण त्याबदल्यात त्याला श्रेय द्यावे लागेल याची अस्वस्थता देखील असतेच. कारण सगळं श्रेय फक्त आपल्याच नावे असावे हा अप्पलपोटेपणा आपल्या अंगी असतो. इथेच आपला घात होत असतो. कारण समोरचा जर आपल्या स्वभावाला ओळखून असेल तर तो मदत करायचा विचार सोडून देतो आणि आपली फजिती पहायला सज्ज होतो. हे म्हणजे असं होतंय की बाष्पीभवन होवून आपल्या पाण्याचा साठा कमी होईल या भीतीने समुद्राने सूर्याला आपल्या डोक्यावर येवू न देण्याचा खटाटोप करायचा. सूर्याचा नैसर्गिक दिनक्रम तो पूर्ण करणारच आहे. पण जर समुद्राने बाष्पीभवन होऊ दिले नाही तर सृष्टीचे अस्तित्व राहील का ? अगदी तसंच तुमच्या कामात तुम्हाला मदत करायला धावणारे अनेक नैसर्गिक मित्र तुम्हाला भेटतील, त्यांच्यावर विश्वास ठेवून मदत घेण्यापूर्वी आणि नंतर त्यांचे आभार मानून तुमच्या श्रेयात त्यांनाही सहभागी करून घ्या. कारण चमकदार हिऱ्याला पैलू पाडणारा कारागिरच हिऱ्याची किंमत वाढविण्याचं काम करत असतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to gosavimanik123 उत्तर रद्द करा.