When you think of the word “successful,” who’s the first person that comes to mind and why?
If you are of average intelligence, your definition of a successful person is very modest. A person who succeeds in even the simplest things is considered successful by you. If he gets what you couldn’t get easily, then he is a successful person according to you. Especially our attitude towards our next generations is exactly the same. Perhaps what you consider ‘successful’ may be ‘ordinary’ to the world. So the world may even make fun of your intelligence. However, each person considers the ‘person’ of his next generation as a successful person in his eyes.
जर तुम्ही सरासरी बुद्धिमत्तेचे असाल, तर यशस्वी व्यक्तीबद्दलची तुमची व्याख्या अतिशय माफक असते.अगदी साध्या साध्या गोष्टीतही यश मिळवणारा व्यक्ती तुम्हाला तुमच्या दृष्टीने यशस्वी वाटत असतो. जे तुम्ही मिळवू शकला नाहीत, ते जर त्याने सहजतेने मिळवले तर तुमच्या दृष्टीने तो यशस्वी व्यक्ती असतो. विशेषतः आपल्या पुढच्या पिढीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नेमका हाच असतो. कदाचित तुम्ही ज्याला ‘यशस्वी’ समजता तो व्यक्ती जगाच्या दृष्टीने ‘सर्वसाधारण’ असू शकतो. त्यामुळे जग तुमच्या बुद्धीची चेष्टा देखील करू शकते. असे असले तरी प्रत्येक व्यक्ती हा आपल्या पुढच्या पिढीतील ‘व्यक्तीलाच’ आपल्या नजरेतून यशस्वी व्यक्ती मानत असतो.

आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं आहे ही सुप्त इच्छा खरं तर वयाच्या १२-१३ व्या वयापासूनच म्हणजेच पौगंडावस्थेच्या अगदी पहिल्या पायरीवरच सुरू होत असते. कारण ते वय हे अनुकरणप्रिय वय असते. मोठं होण्याचं, आदर्शवत नावलौकिक मिळवायचं स्वप्न बघण्याचं वय उलटून जाईपर्यंत आपल्या लक्षातच येत नाही की हे करण्यासाठी प्रचंड एकाग्रता, मेहनत आणि त्यागाची गरज असते. आपोआपच आपण आपल्या स्वप्नांपासून हळूहळू दूर जायला लागतो. मुळातच यशापयशाची आपली मांडणी ही पूर्णतः शैक्षणिक परिक्षांवर आधारित असते. शिक्षणातील गुणवत्ता ही आपण ज्या विषयाचे शिक्षण घेत असतो तेव्हढ्या पुरतीच मर्यादित असते. त्या गुणवत्तेवर आपण खरं म्हणजे ‘यशस्विते’ची व्याख्या करू शकत नाही. पण आपल्याकडे असंच होतं. मुळात वयाची पंचविशी येईपर्यंत आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी नेमकं काय करायला हवं, याचीच दिशा ठरलेली नसते. अशावेळी आपली चुकणारी समीकरणे आपल्याला जगण्यासाठी तडजोडीचे पर्याय स्वीकारायला भाग पाडतात. म्हणजेच बघत असलेली स्वप्ने वेगळी, घेतलेले शिक्षण वेगळेच आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी निवडलेला मार्ग वेगळाच या त्रिशंकू अवस्थेत आपण आयुष्याच्या मध्यावर आलेलो असतो. अशावेळी आपण पाहिलेली स्वप्ने ही एकतर अर्धवट अवस्थेत राहतील ही भीती तरी असते किंवा आपण पाहिलेल्या स्वप्नांपासून खूप दूरवर आलेलो असतो. तेंव्हा आपण जिवंत आहोत तोपर्यंत ही स्वप्ने कुणीतरी पूर्ण करावीत हा आपला आग्रह तयार होतो. याच आग्रहाचे ओझे आपण आपल्या पुढच्या पिढीवर टाकतो.

व्यक्तिगत सुखाची पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली म्हणजे आपण ‘यशस्वी’ झालो असं म्हणणं खरं तर आपण आपल्या पूर्णत्वाला दिलेलं प्रशस्तीपत्र असते. पण अशी छोटी-छोटी स्वप्ने देखील आपल्याला आयुष्यात ‘यशस्वी’ ठरवून जातात. सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबत सीमेवर मुक्कामी राहून देशाच्या सीमेवर बाईक राईड करण्याचे मी महाविद्यालयीन आयुष्यात स्वप्न पाहिले होते. पण रोजच्या जीवनातील हाता-तोंडाच्या लढाईत हे माझे स्वप्न मागे पडले. कालांतराने या स्वप्नाचाच मला विसर पडला. अजूनही सीमेवर स्वप्नपूर्तीसाठी का होईना मला जायला मिळेल का ? याबद्दल मला ठामपणे काही सांगता येणार नाही. पण माझ्या मुलाने मात्र परवा त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त लडाखला मिल्ट्रीच्या बेस कॅम्पवर जावून जवानांशी संवादही साधला आणि बॉर्डरवर बाईक राईड देखील केली. मी हे माझ्या तरुणपणी पाहिलेले स्वप्न होतं. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. एकूणच आयुष्यात कोणत्या टप्प्यावर काय करायचं ? याचं नियोजन न करताच पसरट आयुष्य जगण्यामुळेच आपण आपल्या हातून पूर्ण न झालेली स्वप्ने आपल्या पुढच्या पिढीने पूर्ण करावीत ही अपेक्षा बाळगतो. मग आपली अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यात जर त्यांनी आपले आयुष्य घालवले तर त्यांची स्वप्ने कोण पूर्ण करणार ? पुन्हा मग त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीकडे आशाळभूतपणे पहायचे का ?

एकतर नियोजनबद्ध नसणे याबरोबरच अपयशाला घाबरणे हा दुर्गुण देखील आपण पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवताना येणारा मोठा अडसर असतो. वास्तविक आपल्याला काय करायचं आहे ? किंवा काय बनायचं आहे ? हे आपलं नुसतंच स्वप्न नाही तर कर्म बनलं पाहिजे. नेमकं तेच तर आपण करत नाही. आपण त्याला ‘स्वप्नं’च बनवून ठेवतो. स्वप्न आणि प्रत्यक्षात साकारले जाणारे स्वप्न यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. वास्तवात तुम्ही जे प्रत्यक्षात साकारणारे कर्म करता त्याच्या यशापयशातून तुम्ही ‘यशस्विते’ची व्याख्या करू शकता. त्यामुळे दुसऱ्याने मिळवलेल्या यशाचे कौतुक जरूर करा, झालंच तर त्यातून ‘प्रेरणा’ देखील जरूर घ्या पण त्याच बरोबर स्वतःमधील यशस्विता जरूर शोधा….शेवटी प्रत्येकाची यशस्वितेची व्याख्या ही त्याने केलेल्या कर्मावर अवलंबून असते. आभाळ खूप दाटून आले की अंधारून येते पण मग काही काळाने जोराचा वारा सुटतो अन आभाळ मोकळं होतं हाच निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे अपयशाचा ढगांनी जरी आपले कर्म झाकोळून जाणार असले तरी काही काळाने ते अपयशाचे ढग दूर होवून तुमचं यश झळाळून निघणार आहे. पुढची पिढी तुमचा ‘आदर्श’ नक्कीच ठेवेल पण त्यासाठी आपणही काही चांगली कर्मे करायला हवीत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा