गर्व से कहो हम ‘लेझी’ है..!

Do lazy days make you feel rested or unproductive?

Many times I am told that ‘laziness is the enemy of man’. In short, everyone keeps telling me that even though I know I am lazy. I know that their intentions behind this are certainly not very noble. I believe that they are humiliating me only with the intention of discouraging me. Well, is ‘laziness’ a terrible ‘disease’ like cancer ? Which has its ‘reservation’ in your body by birth. The answer must be no. So is ‘laziness’ an attitude ? But then why is this attitude considered so despicable ?

मला बऱ्याचवेळा ‘आळस हा माणसाचा शत्रू आहे’ असं कुणी ना कुणी ऐकवून जात असते. थोडक्यात मी आळशी आहे, याची मला माहिती असतानाही हे मला प्रत्येकजण ऐकवत असतो. या पाठीमागे त्यांचा हेतू नक्कीच खूप उदात्त वगैरे नसतो हे मला माहिती आहे. ते फक्त मला डिवचण्याच्या हेतूनेच अपमानित करत असावेत असा माझा समज आहे. बरं !, ‘आळस’ हा एखादा महाभयंकर ‘रोग’ आहे का कॅन्सरसारखा ? जो तुमच्या शरीरात जन्मतः च आपलं ‘आरक्षण’ घेवून आलाय ? याचं उत्तर नक्कीच नाही असंच असलं पाहिजे. मग ‘आळस’ ही वृत्ती आहे का ? पण मग ही वृत्ती इतकी तिरस्करणीय का ठरवली जातेय ?

इतरांच्या इशाऱ्यावर न वागणारी माणसे किंवा कोणत्याही प्रकारची घाई न दाखवता आपल्या विशिष्ट गतीने काम करणाऱ्या माणसांना आपल्याकडे ‘आळशी’ म्हणतात. आळसाबद्दल काही गैरसमज पसरविणाऱ्या खाणाखुणा आहेत. सर्वात प्रचलित म्हणजे उशिरापर्यंत झोपणे किंवा जाग आल्यानंतरही बराचकाळ अंथरुणात लोळत पडणे. आपल्याकडे सर्रास अशा काही प्रथमदर्शनी ठळकपणे दिसणाऱ्या गोष्टींवरून ‘आळशी माणूस’ हे विशेषण लावले जाते. आता एकतर झोप प्रिय असणे हा काही आजार होत नाही. शिवाय जाग आल्यावर शिथिल झालेल्या शरीराला कार्यान्वित करण्यासाठी काहीकाळ लोळत पडणे हा काही इतरांना खिजवण्याचा प्रकार नसतो. पण आपल्याकडे लगेच या अतिशय फालतू कारणांमुळे ‘आळशी’ म्हणून हेटाळणी करण्याचा प्रघातच आहे. जी माणसे स्वतःचा ‘खोटेपणा’ आणि ‘मोठेपणा’ जपण्याचा सदोदित प्रयत्न करीत असतात अशीच माणसे समोरच्याला ‘आळशी माणूस’ म्हणून घोषित करण्यात सर्वात पुढे असतात, असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. तुम्हाला ‘काम’ तर व्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं ते देखील तुमच्या वेळेत! अशा अनावश्यक आणि स्वतःच्या हुकूमती वृत्तीला कुणी आव्हान दिले की लगेच त्याला ‘आळशी’ म्हणून घोषित करण्यात ही जमात सर्वात पुढे असते. तेंव्हा अशा ‘खोटेपणा’ आणि ‘मोठेपणा’ जपणाऱ्या जमातीपासून सावध राहिलात तरच ‘आळशी’ हा जड दागिना तुमच्या गळयात पडणार नाही.

समोरच्याने एकसारखं तुम्हाला ‘आळशी’ म्हणल्याने एकप्रकारचे दडपण तयार होवून आपोआपच तुमच्यातील चपळता मंदावते. हेच त्यांना हवे असते. याउलट प्रत्येक गोष्टीकडे केवळ उरकण्याचे सोपस्कार या नजरेने न पाहता त्याकडे आपल्या विशिष्ट मतांनुसार त्याचा आनंद उपभोगण्याला जर कुणी ‘आळशी’ म्हणून हेटाळणी करत असेल तर समजा की हा स्पेशल गुण फक्त तुमच्याकडे आहे….त्याच्याकडे नाही. निव्वळ दुस्वास म्हणून स्वतःची ‘भडास’ ओकणारे लोकच तुम्हाला ‘आळशी’ ठरवत असतात. ‘आळस हा माणसाचा वैरी आहे’ हा भंपकपणा या मानसिकतेतूनच जन्माला आला असावा. दुसऱ्याला आळशी म्हणून डिवचणाऱ्या ह्या ‘तथाकथित’ तत्पर आणि चपळ जमातीला जर त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळाले नाही तर अशी माणसे ‘यशाची अपेक्षा न ठेवता आपले कर्म करावे’ असा उपदेशाचा डोस पाजायला तत्पर असतात. मग ते नियतीपर्यंत पोहोचतात आणि ‘नियतीच्या’ मनात जे आहे तसेच होते, आपण फक्त तिच्या हातचे बाहुले आहोत अशी मखलाशी करत फिरतात. बऱ्याच अघटित घटना घडताना ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय येत असतो. मग अशा घटनांमध्ये वेळच आळसटलेली असते का ? एखाद्या अपघाताच्या ठिकाणी काही सेकंदाच्या फरकाने तुम्ही वाचता अशावेळी तुम्ही वेळेचे किंवा तिच्या आळशीपणाचे आभार मानता ना ! त्यामुळे ‘आळस’ हा कुठला आजार नक्कीच नाही. काही प्रमाणात ती स्वमग्नता असू शकते. पण अशी स्थिती असणारी माणसे ही जगाच्या दृष्टीने भले ही ‘आळशी’ असतील पण ती त्यांच्यापेक्षा नक्कीच स्पेशल असतात. मी आळशी असल्याचा मला अभिमान आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. gosavimanik123

    ” यशाची अपेक्षा न ठेवता आपले कर्म करावे ”
    असा उपदेशा चा डोस पाजायला तत्पर असतात
    ✍️✍️☑️☑️😀😀

    Liked by 2 people

    1. मुकुंद हिंगणे

      खरंय माणिकराव तुमचं 👍👍

      Like