आर्थिक संकटातून कुटुंबाला सावरणारी अन्नपूर्णा : सौ. विजयालक्ष्मी चाकोते

Although it is known that crises come suddenly, not everyone prepares to face them. Those with financial affluence may not be affected by sudden crises. But it is seen that there is a long-term effect on people who are in the same general situation. A couple in solapur (Maharashtra) with a similar situation….Were in debt after their little girl’s open hart surgery. But overcoming this crises Sachin Basavaraj Chakote and Mrs. Vijayalaxmi Sachin Chakote, a couple, recovered their ruined world by selling food. This is the story of their struggle that will inspire others.

संकटं अचानक येतात हे जरी माहीत असलं तरी प्रत्येकजण त्याला सामोरे जाण्याची पूर्वतयारी करतोच असं काही नसतं. ज्यांच्याकडे आर्थिक संपन्नता असते, कदाचित त्यांच्यावर अचानक कोसळणाऱ्या संकटांचा फार परिणाम झालेला दिसून येत नसेल. पण तेच सर्वसाधारण परिस्थितीत असणाऱ्या लोकांवर मात्र दीर्घकालीन परिणाम झाल्याचे दिसून येते. सोलापुरातील असंच सर्वसाधारण परिस्थिती असलेलं दाम्पत्य….आपल्या लहानग्या मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीनंतर कर्जबाजारी झाले होते. पण या संकटावर देखील मात करीत सचिन बसवराज चाकोते आणि सौ. विजयालक्ष्मी सचिन चाकोते या जोडप्याने खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत ढासळलेला संसार पुन्हा सावरला. इतरांना प्रेरणादायी ठरेल अशीच त्यांच्या संघर्षाची ही कर्मकहाणी आहे.

मी राहतो त्या भागात म्हणजे जुळे सोलापुरातील डी मार्टच्या कंपाऊंडला लागूनच विविध खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले आहेत. थोडक्यात ती खाऊ गल्लीच तयार झालीय. ठरलेल्या विक्रेत्यांबरोबरच काही नव्याने विक्री व्यवसाय करू पाहणारे चेहरे देखील अधूनमधून पहायला मिळत असतात. खूप प्रामाणिक, बोलके आणि सचोटीने व्यवहार करणारे असतील तर ‘लक्षात’ राहतात. असंच एक जोडपं काही महिन्यांपासून याठिकाणी ‘छोले-भटुरे’, डोसा आदी चटपटीत खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत आहे. सचिन बसवराज चाकोते आणि सौ. विजयालक्ष्मी सचिन चाकोते या जोडप्याने ‘व्हेज वर्ल्ड’ नावाने छोट्या ट्रॉली व्हॅन मधून खाद्यपदार्थ विक्रीचा शुभारंभ केला. साधारणतः दुपारच्या सुमारास सुरू केलेल्या स्टॉलवर रात्री उशिरापर्यंत खवैय्यांची गर्दी असते. याचा अर्थच खवय्यांना दिली जाणारी सेवा आणि पदार्थांची चव ही गुणात्मक आणि तुलनात्मक ‘सरस’ आहे हे सांगायला नको. आजूबाजूला चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या गर्दीत अस्सल भारतीय शाकाहारी संस्कृती जपणारा स्टॉल म्हणून चाकोते दाम्पत्याचा ‘व्हेज वर्ल्ड’ स्टॉल लगेचच नजरेत भरतो. हे सगळं बघायला खूप छान वाटत असलं तरी प्रत्येक छान, सुंदर गोष्टीमागे एक वेदनादायी प्रवास असतो.

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात ‘चाकोते’ हे एक नावाजलेले घराणे आहे. सचिन बसवराज चाकोते हे या घराण्याशी संबंधीतच आहेत. मात्र त्यांची आवड आणि व्यवसाय हा वेगळा असल्याने ते घराण्याच्या पार्श्वभूमीचा फारसा उल्लेख करत नाहीत. सोलापुरातील बहुतांश नावाजलेल्या हॉटेल्समधून सचिन चाकोते यांनी प्रमुख ‘शेफ’ म्हणून नोकरी केलेली आहे. हॉटेलच्या नोकरीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात अतिशय ओढग्रस्तीने संसार करणाऱ्या सचिन आणि सौ. विजयालक्ष्मी यांच्या संसार वेलीवर शैलजा उर्फ सावली आणि श्रेयस ही दोन फुले उमलली. मर्यादित स्वरूपात आनंदी जीवन जगणाऱ्या सचिन आणि विजयालक्ष्मी यांच्यावर २०१४ मध्ये मोठं संकट कोसळलं. एका आजारपणात मुलगी शैलजा उर्फ सावली हिची ओपन हार्ट सर्जरी करण्याचा विषय संकट बनून चाकोते दाम्पत्याच्या अंगावर कोसळला. जेमतेम कमाई असणाऱ्या सचिन चाकोते आणि सौ. विजयालक्ष्मी यांनी मुलीला वाचविण्यासाठी मुंबईतील नामांकित हॉस्पिटल गाठले. निष्णात डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून शैलजाचे प्राण वाचवले पण हे ऑपरेशन चाकोते दाम्पत्यासाठी आर्थिक वादळ ठरले. लाखों रुपयांचे सावकारी कर्ज डोक्यावर चढले. नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कर्जाचा हप्ता चुकविणे ही तारेवरची कसरत सुरू झाली. ‘व्याजावर व्याज’ ह्या दुष्टचक्रात सापडलेल्या चाकोते दाम्पत्याने अधिक कमाईसाठी म्हणून सोलापूर सोडले. काही महिने पुणे येथे तर पुढे पंढरपूरला बिऱ्हाड हलवले. कोरोनाकाळात सगळंच ठप्प झाल्यावर पुन्हा सोलापूर गाठत सुरुवातीला हातगाडीवर अंडा ऑम्लेटचा व्यवसाय सुरू केला.

कोरोना नंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले तसे चाकोते दाम्पत्याच्या आयुष्यात आलेले संकटांचे काळे ढग देखील निवळू लागले. या काळात आलेले मानापमानाचे कडवट घोट रिचवून बऱ्यावाईट अनुभवांची पुंजी घेऊन सचिन आणि विजयालक्ष्मी आता व्हॅन घेवून ‘व्हेज वर्ल्ड’ हा शाकाहारी पदार्थांचा फिरता स्टॉल जोमात चालवत आहेत. खवैय्यांची वाढती गर्दी त्यांना कर्जमुक्त करणारी नक्कीच आहे त्यापेक्षाही संकटाला रोखून आपल्या संसाराचा गाडा पतीच्या साथीने हिंमतीने ओढणाऱ्या सौ. विजयालक्ष्मी चाकोते यांच्या हाताच्या चवीला दाद देणारे खवैय्ये रोज वाट पहात आहेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

1

)

  1. newsintercontinental.com

    चकोते कुटुंबीयांच्या संघर्षाला सलाम व भावी जीवन सुसह्य होवो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लिखाणातील ही संवेदनाशीलता अशीच राहो या साठी आपणही शुभेच्छा 🌼🙏🌼

    Liked by 2 people