मुलगा परदेशात जाताना….!

My only son is going to Japan for a job as a software engineer. But how much time has passed when this thing happened ? When did it start ? I am trying my best to remember this. We understand that it is a matter of pride for a child to go abroad. It is every parents secret desire to have this pride. What do parents who spend their whole lives eating crisps. Because their son should be smart, briliant especialy in studies comes true when their dream comes true ? Why is this happening to me today ? Today, however, I , who behaved carelessly, was lost. I remember again and again going to see him off at the airport….How did this happen…?

माझा एकुलता एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी जपानला चाललाय. सांगताना एका वाक्यात आणि एका सेकंदात संपणारी ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडतेय. पण ही गोष्ट घडताना नेमका किती कालावधी गेला ? त्याची सुरुवात कधी झाली हे आठवण्याचा मी मनापासून प्रयत्न करतोय. मुलगा परदेशी जाणं ही एक अभिमानाची गोष्ट आपण समजतो. हा अभिमान आपल्याला मिळावा ही पालक म्हणून प्रत्येक आई-वडिलांची सुप्त इच्छा असते. काहीही करून आपला मुलगा हुशार, तल्लख बुद्धीचा विशेषतः अभ्यासात वरचढ असावा म्हणून आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई-बापाचे स्वप्न पूर्ण होत असताना त्यांना नेमके काय वाटत असेल ? आज मला असं का होतंय ? एरवी बेफिकीरीने वागणारा मी आज मात्र हरवलोय. विमानतळावर त्याला निरोप द्यायला जाताना, मी पुन्हा पुन्हा आठवतोय….हे घडलं कसं..?

मी आयुष्याची अठ्ठावीस-तीस वर्षे झाली पत्रकारितेच्या क्षेत्रात भाकरीचा चंद्र शोधतोय. त्यात भरीसभर म्हणजे नाट्यकला जोपासतोय. एकूणच उधळमाणक्याचं घर कुठं ? तर वेशी मागं चार खोपटं असं जगणं असलेल्या माझ्या सारख्या कलंदराची कमाई किती असणार ? पण पत्नी सौ. स्मिताने जीवनसाथी म्हणून मला निवडले अन निगुतीने संसार फुलवला. पहिला मुलगाच झाला. सोहमचा पायगुण खूप चांगला. त्याचा जन्म झाला त्याच दिवशी मला इन्शुरन्स विकल्याचे लाखभर रुपयांचे कमिशन मिळाले होते. पण आजूबाजूला कुजबुज सुरू होती. आता एकावरच थांबा…एकाला देखील नीट पोसायची तुमची ऐपत नाही…..खरंही होतं म्हणा ते….बालसुलभ वयात एखादी वस्तू मिळावी म्हणून पायरीवरच वाट पहात झोपी जाणारा सोहम कधी मोठा झाला…कळलंच नाही. तो चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्याच्या आणि राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकला….तेंव्हा आई-वडील म्हणून आम्हा दोघांचे डोळे त्याच्या यशाने लकाकले. पुढे अगदी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण करे पर्यंत त्याने आपली गुणवत्ता कायम राखली.

लहानपणी कधीतरी कार्टून्स आणि अनिमेशनच्या प्रभावाखाली असलेल्या सोहमला जपानची टेक्नॉलॉजी खुणावू लागली. त्याकरिताच त्याने अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी कॅम्पस मधून एक स्टार्टअप कंपनी पकडून सोलापूरहून थेट पुणे गाठले. तिथूनच माहिती मिळवत त्याने अभ्यासून ऑनलाइन जपानी भाषेच्या परीक्षा दिल्या. आज तो भारतीय अभियंता म्हणून जपानच्या अद्ययावत तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी सज्ज आहे. मुलगा परदेशात चांगल्या पोझिशनची नोकरी आपल्या गुणवत्तेवर, कोणत्याही वशिल्याशिवाय, आधाराशिवाय मिळवतो हा अभिमान बापाची छाती फुगविणारा नक्कीच आहे. पण हेच स्वप्न गुणवत्ताधारकांनी या देशात पहायचं का ? भारतात कितीतरी राष्ट्रप्रेमी वयस्क नागरिक आहेत…जे परदेशात गेलेल्या आपल्या गुणवत्ताधारक मुलाला व्हिडीओ कॉलवर भेटतात. मी पण त्याच गर्दीचा एक भाग तर बनणार नाही ना ? प्रत्येक शहरात, गावात ही अगतिक वृध्दांची गर्दी वाढू लागलीय. आपला देश प्रगतीच्या मार्गावर आहे हीच आपली समजूत आहे. गुणवत्ताधारकांना त्यांच्या योग्यतेचं काम जर हा देश देवू शकला नाही तर….? मुलगा जपानला चाललाय हा आनंद मला आता अस्वस्थेकडे घेवून चाललाय. मुलाला आत्ता मुंबई विमानतळावर निरोप द्यायला चाललोय पण बोलती बंद झालीय…नुसतंच निरखून पाहतोय त्याला….डोळे भरून..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

9

)

  1. Rupali

    Congratulations!

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद रुपाली 🙏🏻🙏🏻🙏🏻

      Like

  2. Randhir Abhyankar

    एका बापाच्या भवना याहून काय वेगळ्या असाव्यात, ज्या हृदयाच्या कप्प्यातून शब्दांकित झाल्यात…..अभिनंदन सोहम👌👌👌💐💐💐

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद रणधीर 🙏🏻🙏🏻🙏🏻

      Like

  3. smitahingne

    शब्दांच्या पलीकडले….

    Like

  4. Shrikant Kamble

    नाटकात शब्दांची रत्ने पाडण्यात आणि सोबतीला पत्रकारितेचा पिंड जपण्यात
    आयुष्यातील उमेदीची वर्षे रंगवली मित्रा. असा जीवनानुभव कमी व्यक्तीमत्वांना
    लाभला असेल, त्यामध्ये मुकंदराव तुम्ही आहात. सोहम जपानला चालला या आनंदाने
    अख्ख कुटुंब कसं आतून-बाहेरुन मोहरुन गेलयं… ते तुमच्या चेह-यावरुन लपलं
    नाही. तरीपण तुम्हाला आनंद अस्वस्थेकडे का घेऊन जातोय. राखेतून उभे कसे रहावे,
    याचा कृतीशील संदेश ज्या देशाने जगाला दिला, त्या जपानमध्ये सोहम जातो याचा
    अभिमान वाटतो. देशाच्या सीमा ओलांडून ज्ञानानुभूती मिळवण्यासाठी अनेक मंडळी
    जातात. सोहमच्या स्व कौशल्याचा उपयोग जपानला होइल. तुम्हाला केवळ व्हिडिओ
    कॉलिंगवर पाहण्याची गरज नाही. तुम्ही जाल अर्थात मौज नि तिथल्या समाज जीवनाचं
    रसग्रहण करण्यासाठी. जपानचं समाजजीवन खूप समृध्द आहे. तिथल्या मातीत
    टेक्नॉलॉजीचा गंध का दरवळतो, नितीतत्वाचं तिथल्या वर्तमानाशी नातं, वीण एवढी
    घट्ट कशी? समाजातील आर्थिकसह सर्वप्रकारच्या विषमतांशी त्यांनी कशी लढाइ
    जिंकली. तिथली प्रसार माध्यम आणि राजकारण, प्रसारमाध्यमांचा समाज जीवनावर
    असलेला सांस्कृतिक, वैचारिक प्रभाव कसा असं सांस्कृतिक जगणं अनुभवण्याची संधी
    तुम्हाला मिळेल. मला नक्की विश्वास आहे, तुमच्या मनात कसलीही हुरहूर राहणार
    नाही. याउलट तुम्ही छाती अभिनानाने अधिक फुलेल. शेवटी संस्कार रोप लावलयं कोणी
    याला महत्व आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तुमचा इतका वास्तवदर्शी आहे,
    त्याचं प्रतिबिंब सोहम यांच्यात दिसते. तो नक्कीच तुम्हाला तिकडे बाेलावून
    घेइल. तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगवर समाधान मानण्याची वेळ येणार नाही. त्याचा
    मंगळवारी झालेल्या कार्यक्रमातील साधेपणा हाच त्याच्या वर्तनव्यवहाराची रोख
    अशी पावती आहे. मित्रा अस्वस्थ होवू नको. सोहम नि तुम्हा सर्वांचै अभिनंदन.
    त्याहून अधिक सौ. वहिणींचे….
    श्रीकांत…..

    श्रीकांत कांबळे,

    वृत्त संपादक (शहर)

    सोलापूर. *
    *97655 36999

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      मित्रवर्य श्रीकांत, आपण सगळे एकाच नावेतील सहप्रवासी आहोत. आपल्या अपत्याच्या भरारीकडे डोळे भरून पाहणे हे जसे नैसर्गिक तशीच त्याच्या प्रवासातील अनामिक भीतीची काळजी देखील नैसर्गिकच. बाकी समाधानी तर आहेच मी. तुमच्यासारखे मित्र सोबत असल्यानंतर एकाकी वाटण्याचे काहीच कारण नाही. धन्यवाद मित्रा 🙏🏻🙏🏻🙏🏻

      Like

  5. Nilkanth Watte

    एक कटू सत्य आहे, परंतु आप बिती तुम्ही खुप छान शब्दात मांडली. थोडक्यात जी सरकारकडून अपेक्षा आहे ती सुद्धा खुप छान . इथेच सुविधा असतील तर विमानतळावर जायची वेळ येणार नाही

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

      Like