अपत्याच्या संदर्भातील ‘प्रशंसा’ हीच सर्वोत्तम…!

What was the best compliment you’ve received?

Everyone wants to ask someone such a question. Because after experiencing the ups and downs of success and failure in life, every man is definitely determined to be ‘admirable’ to the people concerned with his interests. There are many such appreciable moments in life. If you are suggested to choose the best compliment from among them, surely you will choose the best ‘compliment’ from people for your child’s success.

तुम्हाला मिळालेली सर्वोत्तम प्रशंसा कोणती होती…? असा प्रश्न आपल्याला कुणीतरी विचारावा असं प्रत्येकालाच वाटत असते. कारण आयुष्यातील यश-अपयशाचे चढ-उतार अनुभवल्यानंतर प्रत्येक माणूस हा त्याच्याशी जोडलेल्या हितसंबंधी लोकांसाठी ‘प्रशंसनीय’ नक्कीच ठरलेला असतो. आयुष्यात असे अनेक प्रशंसनीय क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. त्यातून निवडून सर्वोत्तम प्रशंसा सांगा, असं जर तुम्हाला सुचवलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या अपत्याच्या यशाबद्दल लोकांकडून तुमची केली जाणारी ‘प्रशंसा’ सर्वोत्तम ठरवाल.

‘प्रशंसा’ ही प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणारी ‘कृती’ आहे. ती सहजतेने असो, आपुलकीने असो अथवा टवाळीच्या उद्देशाने असो अथवा जळफळाटाच्या उद्देशाने असो, प्रशंसा स्वीकारणारा ती निरागसतेनेच स्वीकारत असतो. त्यात त्याला आनंद मिळत असतो. पुढे अधिक जोमाने कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. म्हणूनच प्रत्येकजण हा प्रशंसेचा भुकेला असतो. कुणीतरी आपली ‘प्रशंसा’ करतंय म्हंटल्यावर ती व्यक्ती नक्कीच सुखावून जात असते. मी पण यापासून वेगळा नाही. नाट्यक्षेत्र आणि प्रसिद्धी माध्यमांशी जोडला गेलो असल्याने कदाचित ‘प्रशंसा’ हे माझं जगण्याचं ‘टॉनिक’ बनले असावे. वृत्तपत्र क्षेत्रात संपादकीय विभागात नोकरीला लागलो तेंव्हाच आमच्या संपादक साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितले होते….आपला संपादकीय टेबल हा ‘बर्म्युडा ट्रँगल’ आहे. एखादे पत्रक घेऊन आलेला माणूस एकदा का या टेबलाच्या प्रभाव क्षेत्रात आला की तो कायम कुठले ना कुठले पत्रक घेवून यायला लागतो. कारण त्याला प्रसिद्धी हवीहवीशी वाटत असते. त्याच्या पत्रकावरून तयार केलेली बातमी वाचून समाजात त्याची ‘प्रशंसा’ होत असते. त्याला होणाऱ्या ‘प्रशंसेची’ लत लागते. आम्ही तर बोलून-चालून बोरूबहाद्दर…. आम्ही ‘त्या’ नशेपासून अलिप्त कसे राहणार ? सावज टिपण्यासाठी विणलेल्या जाळ्यात स्वतः कोळीच अडकत असतो. तशीच आमची गत. सुरुवातीला बातमी चांगली लिहिली म्हणून वरिष्ठांकडून प्रशंसा व्हायची मग बातमीमुळे ‘अमक्या’ समाजाला न्याय मिळाला, ‘तमक्या’ला प्रकाशात आणले…अशा स्तुतीसुमनाने ही भूक वाढलेलीच असायची. पुढे नाट्यक्षेत्रात हीच सवय अधिक गडद होत गेली. कारण कलाकाराचं खाद्यचं मुळात ‘प्रशंसा’ असते. कुणा एखाद्या दर्दी रसिकाने उत्स्फूर्तपणे दाद दिली….व्वा मुकुंदराव व्वा…काय लिहिलंय नाटक ! बस्स एव्हढीच ‘प्रशंसा’ रात्र-रात्र जागून लिहिलेल्या नाटकाची ‘बेहिशेबी’ कमाई ठरायची. त्यामुळे अशा वातावरणात बिनपैशाचं कर्तृत्व गाजविणाऱ्या माझ्यासारख्या लेखकूच्या आयुष्यात ‘प्रशंसेचा’ पाझर कधीच आटला नाही.

सतत होणारी ‘प्रशंसा’ ही जशी तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारी असते, तशीच ती एका उंचीवर गेल्यानंतर तुम्हाला ‘अहंकाराच्या’ दरीत ढकलून देणारी धोकादायक शक्ती पण असते. हे मात्र ज्याने-त्याने आपल्या कुवतीनुसार ओळखायचं असतं. बैलगाडीखालून सावली मिळतेय म्हणून चालणाऱ्या मालकाच्या इमानी कुत्र्याला जर वाटायला लागले की बैलगाडी आपल्यामुळेच चालतेय तर मग मालक त्याच्या पेकाटात लाथ घालतो. त्यामुळे अहंकार वाढेल एव्हढी ‘प्रशंसा’ मिळवू नये…..अर्थात सतत मिळणाऱ्या प्रशंसेमधून उबग आला म्हणून का होईना एकप्रकारची विरक्ती यायला लागते…तशी माणसाच्या आयुष्यात पन्नाशी पार केल्यानंतर हळूहळू सर्वच पातळ्यांवर विरक्ती यायला लागतेच. तेंव्हा सततच्या प्रशंसेमधून देखील विरक्त व्हायला शिकलं पाहिजे. तरच जगण्याचा आणि अवतीभवती गोळा झालेल्या गोतावळ्याचा खरा आनंद घेता येतो.

बाकी खरी ‘प्रशंसा’ आणि तोंडदेखली ‘प्रशंसा’ ही अनुभवातून आपोआप कळायला लागते. कारण समोरच्याच्या चेहऱ्यावरची वाक्ये वाचण्याचा अनुभव आपल्या पाठीशी जमा झालेला असतो. एकमात्र खरं की आपल्या होणाऱ्या प्रशंसेपेक्षा सर्वाधिक आनंद हा आपल्या अपत्याच्या यशासाठी कुणीतरी आपली प्रशंसा करायला लागते, त्यावेळी होत असतो. सर्वसामान्यांपासून ते थेट मुकेश अंबानी सारख्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या उद्योगपतीला देखील स्वतःच्या मुलाच्या कर्तृत्वाची प्रशंसा केल्याचे मनापासून आवडत असते. परवा प्री वेडिंग पार्टीच्यावेळी अनंत अंबानीने ज्या प्रकारे मुलाखत दिली. पत्रकाराच्या विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. त्यावरून मुकेश अंबानीच्या चेहऱ्यावरची सार्थकता नक्कीच ओसंडून वाहणारी अशीच होती. प्रत्येक बापाला आपल्या मुलाच्या यशाचे कौतुकच असते. नव्हे हीच तर त्याच्यासाठी सर्वोत्तम प्रशंसा असते. माझ्या मुलाने देखील केवळ त्याच्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर जॉबसाठी जपान गाठले. त्याच्या या यशाने आज माझी जी समाजात प्रशंसा होतेय तीच माझ्यासाठी सर्वोत्तम प्रशंसा आहे हे मला इथे अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Randhir Abhyankar उत्तर रद्द करा.

Comments (

1

)

  1. Randhir Abhyankar

    जपानी गुड्डा😀👌👌👍👍

    Liked by 1 person