Khatal Brothers jayshankar chivda at Lamboti (Tal.-Mohol) on the Solapur-Pune highway has now become world famous. But Rukminitai Khatal who made this chivda was illiterate. Rukminitai, who had taste in her hands but no sense of accounting, used to collect bills from customers using Bangles in her hands to get accurate bills. Rukminitai khatal, who made the world famous Jayshankar chivda (Lamboti chivda) and peanut chutney, used Bangles algebra for calculations.
सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या लांबोटी (ता.- मोहोळ) येथील खताळ बंधू यांचा जयशंकर चिवडा ( लांबोटी चिवडा ) आता जगप्रसिद्ध झालाय. पण हा चिवडा बनविणाऱ्या रुक्मिणीताई खताळ ह्या निरक्षर होत्या. त्यांच्या हाताला चव होती, पण हिशोबाचा गंध नसलेल्या रुक्मिणीताई ग्राहकांकडून बिल घेताना हातातल्या बांगड्यांचा उपयोग करीत अचूक बिल घ्यायच्या. आज जगप्रसिद्ध ठरलेल्या जयशंकर चिवडा आणि शेंगदाण्याची चटणी बनविणाऱ्या रुक्मिणीताई खताळ यांचे हिशोबासाठी वापरात येणारे बांगड्यांचे बीजगणित अफलातून होते.

मूळचे बिटले या गावचे रहिवाशी असलेले कै. शंकरराव खताळ आणि कै. रुक्मिणीताई खताळ हे दाम्पत्य १९७२ च्या दुष्काळात उपजीविकेसाठी लांबोटी (ता.- मोहोळ) येथे आपल्या कुटुंब कबिल्यासह आले. रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून सुरुवातीला दोघांनी काम केले. गावापासून दूर आड रानात मजुरांना विश्रांतीच्या वेळी चहाची तलफ व्हायची. मग ठेकेदाराला चहाची व्यवस्था करायला यातायात करावी लागायची. कै. शंकरराव खताळ यांच्या डोक्यात कल्पना चमकून गेली. आपणच चहाचे कॅन्टीन सुरू केले तर ? मग ठेकेदाराला सांगितल्यावर त्याने कॅन्टीन सुरू करण्यासाठी पाचशे रुपये दिले. अशा तऱ्हेने सोलापूर-पुणे महामार्गावर शंकरराव खताळ आणि रुक्मिणीताई खताळ या जोडप्याचे एका झोपडीत चहाचे कॅन्टीन सुरू झाले. सुरुवातीला नुसता चहाच मिळत होता. त्यामुळे फारसे गिऱ्हाईक होत नव्हते. महामार्ग असल्यामुळे वाहनधारक ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी चहासोबत आणखी काहीतरी द्यायला हवे ? या विचारातून जयशंकर मक्याच्या चिवड्याचा जन्म झाला. शंकरराव आणि रुक्मिणीताई दोघेही अशिक्षित. पण शंकरराव डोकेबाज होते. त्यामुळे शंकररावांच्या कल्पना आणि रुक्मिणीताई यांचे कष्ट यातून जयशंकर मक्याचा चिवडा खपू लागला.

हायवे वरून वाहतूक करणारे पंजाबी (सरदारजी) ट्रक चालक आपले ट्रक थांबवू लागले. त्यांना मक्याच्या चिवड्या बरोबरच आवडेल अशी शेंगाची चटणी रुक्मिणीताई खताळ यांनी बनवायला सुरुवात केली. खताळ यांच्या मक्याचा चिवडा आणि शेंगाच्या चटणीला सोलापूर बाहेर परराज्यात पहिल्यांदा नेलं ते सरदारजी लोकांनी. व्यवसाय म्हंटलं की चढ-उतार हे आलेच. पण कल्पक डोक्याचे शंकरराव खताळ येणाऱ्या संकटांशी दोन हात करायला सज्ज रहायचे तर कष्ट करून सासू आणि आपल्या दोन मुलांना तानाजी आणि गणेश यांना मदतीला घेत रुक्मिणीताई व्यवसायाची बाजू सांभाळायच्या. आपल्या अशिक्षितपणावर रुक्मिणीताई यांनी आपल्याच अनोख्या पद्धतीने मात केली होती. दोन्ही हातात सवाष्ण म्हणून भरलेल्या बांगड्या त्या ग्राहकांच्या बिलाच्या हिशोबासाठी उपयोगात आणायच्या. एक ग्राहक आले की बांगडी मागे सरकवायच्या. प्रत्येक बांगडीचे निर्धारित मूल्य त्यांनी ठरवलेले असायचे. याशिवाय जेंव्हा शंकरराव कामानिमित्त बाहेर जायचे तेंव्हा ते रुक्मिणीताईंच्या सोबतीला हिशोब करण्यासाठी वयस्कर गावकऱ्याला बसवायचे. त्याला मोबदला द्यायची त्यांची तयारी असायची.

अतिशय प्रतिकुलतेमधून सुरू केलेल्या हॉटेल जयशंकरचा व्यवसाय वाढत असतानाच दि. १३ ऑगस्ट २००४ मध्ये शंकरराव खताळ यांचे अपघाती निधन झाले. या दु:खातूनही सावरत रुक्मिणीताई यांनी व्यवसायात पोकळी निर्माण होवू दिली नाही. अर्थात यावेळी त्यांचे दोन्हीही कर्तबगार मुले मोठा मुलगा तानाजी आणि धाकटा मुलगा गणेशप्पा जबाबदारीने पुढे आले होते. त्यांनी आपल्या कर्तबगारीवर व्यवसायाबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोहोळ तालुक्यात आपले वेगळेपण सिद्ध केले. मात्र नियतीने पुन्हा एकवार खताळ कुटुंबाला धक्का दिला. मुलगा तानाजी खताळ यांचे दि.३१ मार्च २०२१ रोजी निधन झाले. तर व्यवसायाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या रुक्मिणीताई यांचे दि. ४ मे २०२१ रोजी निधन झाले.

नियतीने खताळ कुटुंबावर एव्हढे मोठे आघात केल्यावर या अपरिमित हानीतून खताळ कुटुंब सावरले ते केवळ कै. शंकरराव, कै. रुक्मिणीताई आणि कै. तानाजीराव यांनी घालून दिलेल्या आदर्श नियमांमुळेच. एकत्र कुटुंबपद्धती हे या खताळ कुटुंबाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता कै. तानाजीराव खताळ यांच्या जागी गणेशप्पा शंकरराव खताळ आणि कै. रुक्मिणीताई खताळ यांच्या जागी श्रीमती विमलताई तानाजी खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली खताळ कुटुंबाची चौथी पिढी अक्षय तानाजी खताळ, रुद्राक्ष तानाजी खताळ, अनिरुद्ध गणेश खताळ आणि संग्राम गणेश खताळ हे जयशंकर हॉटेलचे व्यवस्थापन पहात आहेत. कै. रुक्मिणीताई यांनी चिवड्याच्या चवीचे ‘गुपित’ आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना सांगून ठेवले आहे. तेच गुपित खताळ यांची प्रत्येक पिढी जपणार आहे. जगभरात पोहोचलेला जयशंकर चिवडा आता ऑनलाईन मागवता येतो. खताळ यांच्या नव्या पिढीने वेबसाईट सुरू करून जगभरातील खाद्यप्रेमींची सोय केली आहे. कै. रुक्मिणीताई यांच्या हिशोबी बांगड्यांचे बीजगणित हेच तर आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.