भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला कितपत फायदा झाला…?

Long March, Rathayatras or Sankalp yatras taken out by the political leadership have a special significance. This public relations yatra is seen as an effective means of mingling with the people and communicating directly with the people on  party positions and burning issues of the people. In 1930, Mahatma Gandhi not only shook the British Power but also taught the world the new science of non-violence of the non-cooperation movement by carrying out the ‘Dandi’ Yatra as a salt satyagraha. Of course, in the background of the freedom struggle, it was recorded in history as a dedicated act of the people. But the long march  started after independence have proved to be the undoing of this political party. In this background, the issue of how far the congress was able to get the results of ‘Bharat Jodo’ yatra taken by Rahul Gandhi almost 20 months before the Parliament elections should be discussed now.

राजकीय नेतृत्वाकडून काढण्यात येणाऱ्या पदयात्रा, रथयात्रा किंवा संकल्प यात्रांना एक विशेष महत्व आहे. पक्षीय भूमिका आणि लोकांच्या ज्वलंत विषयावर लोकांमध्ये मिसळून थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून या जनसंपर्क यात्रांकडे पाहिले जाते. १९३० मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह म्हणून ‘दांडी’यात्रा काढत फक्त ब्रिटिश सत्तेला हादरा दिला नाही. तर असहकार चळवळीचे अहिंसेचे नवे शास्त्र जगाला शिकविले. अर्थात स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ती लोकजागराची समर्पित कृती म्हणून इतिहासात नोंदली गेली. मात्र स्वातंत्र्यानंतर निघालेल्या पदयात्रा ह्या राजकीय पक्षांना उसने अवसान मिळवून देणाऱ्याच ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या तब्बल २० महिने अगोदर राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे फलित काँग्रेसला कितपत मिळवता आले हा मुद्दा आता चर्चिला जायला हवा.

भारतीय जनता पक्षाचे सर्वात पॉवरफुल नेते असलेले नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या पर्वकाळाला कालच म्हणजे दि. ९ जून २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर १८ व्या लोकसभेसाठी देशभर घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून देशातील प्रत्येक राजकीय पक्षांची जनमानसात असलेली ‘ताकद’ समोर आली आहे. हीच ताकद वाढलेली असावी ज्यामुळे आपण सत्ता सिहांसनावर आरूढ होवू या आसक्तीतून प्रत्येक राजकीय पक्ष थेट लोकांमध्ये मिसळून त्यांच्या मनात स्थान मिळविण्यासाठी ज्या काही ‘लटपटी’ करतात, ज्याला ते त्यांच्या पक्षाचा ‘कार्यक्रम’ म्हणतात. तर अशा पक्षीय कार्यक्रमात ‘पदयात्रा’ सर्वात वरच्या क्रमावर असते. पक्षाची आणि नेतृत्वाची प्रतिमा लखलखीत करण्याच्या सर्वच ‘लटपटी’ प्रभावहीन ठरल्यानंतर शेवटचे ‘ब्रह्मास्त्र’ म्हणून पदयात्रांचे आयोजन करण्याचा गेल्या कित्येक वर्षाचा राजकीय पक्षांचा प्रघात पडलाय. २०१४ पासून ‘शरपंजरी’वर पडलेल्या क्षीण काँग्रेसला पुन्हा ‘संजीवनी’ देवून निवडणुकीच्या मैदानात उभे करायचे ह्या आणि केवळ ह्याच कारणासाठी राहुल गांधी यांनी दि. ७ सप्टेंबर २०२२ मध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत एकूण ३५०० किलोमीटरची ‘भारत जोडो’ पदयात्रा केली. दीडशे दिवस चाललेल्या या भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांनी १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील कॉंग्रेसप्रेमी जनतेला भावनिक ‘साद’ घातली. लोकसभा निवडणुकीपूर्वी तब्बल २० महिने अगोदर निघालेल्या या यात्रेचा काँग्रेसला काहीच फायदा होणार नाही याच भ्रमात इतर सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय निरीक्षक राहिले. पण मतदारांपासून दुरावलेल्या काँग्रेसला पुन्हा मतदारांच्या जवळ नेण्याचा उद्देश राहुल गांधी यांनी सफल करून दाखविला. या बरोबरच विरोधकांनी तयार केलेल्या ‘पप्पू’इमेजमधून बाहेर पडत स्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये आणि राज्या-राज्यामधील स्वपक्षीय नेतृत्वामध्ये राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची असलेली ‘क्षमता’ ठसविण्यात राहुल गांधी हे यशस्वी ठरले. मुळातच कॉंग्रेसच काँग्रेसला हरवत असते या ‘नेरेटिव्ह’ला छेद देत काँग्रेसच काँग्रेसला जिंकून देत असते हा आत्मविश्वास जागृत केला. गेल्या दहा वर्षातील काँग्रेसचे संसदेमधील ‘नगण्य’ अस्तित्व पाहता आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले संख्याबळ काँग्रेसमध्ये ‘उर्जितावस्था’ आणण्यास प्रेरक ठरणारे नक्कीच आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यातून ही ‘भारत जोडो यात्रा’ गेली नाही त्या राज्यांमध्ये देखील ‘काँग्रेस बदलतेय’ हा मेसेज मतदारांमध्ये पोहोचला.

सत्तांतरासाठी पदयात्रांचे आयोजन करण्याची ‘खटपट’ उत्तरेतील राजकीय पक्षांपेक्षा दक्षिणेतील राजकीय पक्षांकडून नेहमीच केली जाते. विशेष म्हणजे त्या-त्या वेळी अशा पदयात्रांचा संबंधित राजकीय पक्षांना फायदा देखील झाला आहे. एकूणच उत्तर असो किंवा दक्षिण असो…पूर्व असो किंवा पश्चिम भाग असो, संपूर्ण भारतात जनमानसात ‘मनपरिवर्तन’ आणि ‘मतपरिवर्तन’ करण्यासाठी पदयात्रा हा रामबाण उपाय म्हणून सिद्ध झालेला आहे. गेल्या ३०-४० वर्षांमधील निघालेल्या पदयात्रांचा ‘धांडोळा’ घेतला तर स्व. इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी स्व.जयप्रकाश नारायण यांनी देशभर पदयात्रांच्या माध्यमातून उठवलेले ‘काहूर’ जसे ‘अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश…जयप्रकाश’ या घोषणेने एका पिढीने लक्षात ठेवले. अगदी त्याच प्रकारे १९९० मध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी १९९० मध्ये सोरटी सोमनाथ ते अयोध्या आयोजित केलेली ‘रथयात्रा’ दोन पिढ्यांच्या आत्मीयतेचा विषय बनली. भाजपाला त्यावेळी लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेचा फायदा देखील झाला. त्यावेळी लोकसभेत ८५ वरून १२० वर भाजपाचे संख्याबळ पोहोचले होते. आताही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ ९९ पर्यंत पोहोचले आहे. अर्थात ही संख्या आजजरी दुबळी वाटत असली तरी विजनवासातून परत सत्ताकारणात पुनर्स्थापित होण्यासाठी आशादायी ठरणारी आहे. एकूणच भारतीय राजकारणात पदयात्रांमुळे राजकीय पक्ष आणि नेतृत्वाला पुन्हा नवी ‘उभारी’ मिळते हे मात्र पुन्हा-पुन्हा सिद्ध होत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. manishgadade009

    लोकशाहीत‌ जनता जनार्दन असते,लोकांमध्ये जाऊन जनमानसात मिसळूनकौल मागीतला तर ती भरभरून देते.राहुल गांधी यांनी हाच गांधीमार्ग स्विकारला!

    Liked by 3 people

    1. मुकुंद हिंगणे

      हेच सत्य आहे. लोकशाहीमध्ये जनताच जनार्दन असते. 👍👍

      Liked by 1 person