नेहमीच चुका करणाऱ्या माणसांवर पण विश्वास ठेवावा…!

People who always make mistakes should be trusted…!

In life, whenever make all decisions entirely on our own. Some important decisions need to be made with the advice or guidance of others. Naturally, there is no issue with seeking someone’s advice or guidance. However, if the decision turns out to be wrong, all the responsibility is placed on us. If the decision is beneficial, everyone wants to share in that success. But if the same decision leads to a loss, we have to accept all the failure over selves. Therefore, sometimes it is better to trust those who have made mistakes repeatedly rather than those who claim their advice is never wrong. This is because, while making decisions, you can be extremely vigilant about how to minimize errors or losses.

आयुष्यातील अगदी सगळेच निर्णय आपण एकट्याने कधीच घेत नसतो. काही महत्वपूर्ण निर्णय हे असे असतात की ते आपल्याला इतरांच्या सल्ल्याने किंवा मार्गदर्शनानेच घ्यावे लागतात. अर्थात कुणाचा सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यायला आपली काहीच हरकत नसते. मात्र निर्णय चुकला तर त्याची सर्व जबाबदारी ही आपल्यावरच थोपवली जात असते. घेतलेला निर्णय फायदेशीर ठरला तर  त्या यशाचे सगळेच वाटेकरी होतात. पण ‘तोच’ निर्णय नुकसानीचा ठरला तर ते सर्व अपयश आपल्याला स्वीकारावे लागते. म्हणूनच ‘माझा दिलेला सल्ला कधीच चुकीचा नसतो’ अशा अविर्भावात वावरणाऱ्या माणसांपेक्षा वारंवार चुका करणाऱ्या माणसांवर विश्वास ठेवणे काहीवेळा योग्य ठरते. कारण निर्णय घेताना कमीतकमी चुका किंवा नुकसान कसे होईल ? याबद्दल तुम्ही कमालीचे जागरूक राहू शकतात.

‘आमचं अगदी मजेत चाललंय’ असं सांगणारा माणूस खरं म्हणजे आधाराचा खांदा शोधत असतो. सुखाचे आभासी वर्णन रंगवून सांगणारा व्यक्ती हा मुळातच वेगवेगळ्या व्यथा आणि अडचणींनी घेरलेला असतो. अशावेळी तो आपल्या व्यथा आणि अडचणींतून सुटका कशी करून घेता येईल याच विवंचनेत असतो. त्यामुळेच तो इतरांसमोर ‘आपण खूप सुखात’ असल्याचे वर्णन रंगवून सांगत असतो. आपल्यापेक्षा समोरचा व्यक्ती सुखी आहे हाच माणसाचा स्थायी स्वभाव असल्याने माणसांमध्ये ‘सुख वर्णना’चे स्तोम माजले आहे. असे असले तरी अडचणीच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर अडचणींचा लवलेशही येऊ देवू नका. कारण ‘सुख वर्णना’चे स्तोम माजवणारे आपल्या अडचणीचे भांडवल करतील ही भीती जशी रास्त आहे. त्याच प्रमाणे कुणाचा आधार न शोधता आपणच आलेल्या अडचणींना सामोरे जाणे अधिक रास्त असते.

आयुष्यात मैत्री ही केलीच पाहिजे किंबहुना ती असावीच. पण मैत्री करण्यासाठी योग्य माणसाची किंवा सहकाऱ्याची निवड करणे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते. खरं म्हणजे आपल्यावर आलेल्या अडचणीच्या काळात ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. याच काळात आपला मित्र कोण ? आणि शत्रू कोण याचा आपल्याला दृष्टांत मिळत असतो. आपणच मित्र म्हणून जवळ केलेला व्यक्ती आपल्या अडचणीचे भांडवल करून आपली यथेच्छ बदनामी करताना दिसले की आपण हताश होतो. पण आपल्या वाट्याला येणाऱ्या या कटू अनुभवाला आपणच जबाबदार असतो. आपण मित्राची निवड करायला चुकलो याची पहिल्यांदाच आपल्याला जाणीव होते. पण आपण त्याला साधा जाब सुद्धा विचारू शकत नाही. कारण मित्र म्हणून आपण त्याच्याशी गट्टी करताना आपली अनेक गुपिते आणि आपली कमकुवत बाजू त्याच्यासमोर जाहीर करून बसलेलो असतो. बस्स….तुमच्या अडचणीच्या काळात तो याच कमकुवत बाजू जगजाहीर करत तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी तुम्ही काहीच करू शकत नसता. मैत्रीची आपली निवड चुकली याचे दूषण स्वतःलाच देत असहायता दाखविण्याशिवाय तुमच्या हाती काहीच शिल्लक नसते. मग मैत्री करावी तर कुणाशी ? हा प्रश्न तुमच्यासमोर उरतो. खरं म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या जवळच असतात. आपण नेहमी आपल्या बरोबरीच्या व्यक्तीशी मैत्री करावी हाच संस्कार आपल्याला केलेला असतो. या संस्कारात पण तसं पाहिलं तर स्वार्थीपणा लपलेला असतो. आपल्या प्रगतीमध्ये पूरक ठरतील अश्याच व्यक्तींच्या घोळक्यात आपण रहायचे हा मतलबीपणा त्यामागे असतो. मात्र बरोबरी साधणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये स्पर्धा असते हेच आपण विसरून जातो. याउलट आपल्यापेक्षा कमी बुद्धीचा किंवा स्तरावरचा मित्र असेल तर तो नक्कीच आपल्याशी कधी ईर्षा किंवा स्पर्धा करणार नाही. प्रत्येक गोष्टीत किंवा कामात त्याच्या होणाऱ्या चुका आपण चेष्टेचा विषय बनवत असलो तरी तो मात्र तुमच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला त्याच्या आकलन शक्तीच्या कमकुवतपणा बद्दल माहिती असते. अश्यावेळी तो तुमच्याकडून मिळणाऱ्या सहाय्याची अपेक्षा करत असतो. तुमच्या अडचणीच्या काळातदेखील तोच तुमच्याशी प्रामाणिक रहात असतो. कारण या अडचणींतून देखील तुम्ही सुखरूप बाहेर पडाल याची त्याला खात्री असते. कारण तो तुम्हाला ‘सुपरपॉवर’ समजत असतो. आपल्या अडचणीच्या काळात अशा कमकुवत माणसांची साथ देखील आपल्याला लढण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देवून जात असते. यावर विश्वास ठेवा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Nora उत्तर रद्द करा.

Comments (

1

)

  1. Nora

    Well said.

    Liked by 1 person