अनुभवसमृध्दी बरोबरच विचारसमृध्दी आवश्यक….!

Along with wealth of experience, wealth of thought is necessary…..!

If you always mingle with people of the same place and the same mindset, it becomes easy to believe that everything should be done in one particular way. But if you travel frequently and interact with people of different mindset, you will come to believe that everything can be done in various ways. Thus by traveling, you not only enrich your experiences but also broken your thinking

तुम्ही नेहमी एकाच ठिकाणी आणि एकाच विचारपद्धतीच्या लोकांमध्ये मिसळत असाल तर प्रत्येक गोष्ट एकाच पद्धतीने केली पाहिजे यावर तुम्हाला विश्वास ठेवणे सोपे जाते. पण तेच तुम्ही जर सतत भटकंती करत असाल, वेगवेगळ्या विचारपद्धतीच्या लोकांमध्ये मिसळत असाल तर प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करता येते यावर तुमचा विश्वास बसेल. त्यामुळे भटकंती केली तर तुम्ही नुसतेच अनुभव समृद्ध होणार नाहीत तर त्यासोबत तुम्ही विचारसमृद्ध देखील व्हाल.

कामाच्या निमित्ताने ओळखीचे झालेले एक सद्गृहस्थ खूप दिवसांनी काल अचानक रस्त्यात भेटले. आपुलकीने खूप अनौपचारिक गप्पा मारल्या. मी आता निवृत्त झालोय, तुम्ही कधी होणार आहात…? असा प्रश्न त्यांनी आस्थेनेच विचारला. मी तात्काळ उत्तरलो…सरणावर चढण्याअगोदर काही तास मी निवृत्त झालेलो असेल. त्यांचा उतरलेला चेहरा पाहून मी हसत-हसत म्हंटलं, अहो…मी बोलूनचालून ‘बोरूबहाद्दर’ . मला निवृत्तीची मुभा कुठंय…? पत्रकारिता करताना वरिष्ठांनी एकच सांगितलं होतं…तुमच्या आवडीने तुम्ही या क्षेत्रात आलात..आता यातून मरेपर्यंत सुटका नाही. जोपर्यंत डोळे, कान, मेंदू आणि हात काम करतायत तोपर्यंत तुम्हाला विश्रांती नाही. तर निवृत्तीचा मुद्दा एव्हढ्यासाठी चघळायला घेतलाय, ज्यांना कामात एकसुरीपणा वाटतो त्यांना आपल्या कामाचा लवकरच कंटाळा येतो. साधारणतः पन्नाशी ओलांडलेला व्यक्ती रोज निवृत्तीचा विचार डोक्यात घेऊनच कामावर येत असतो. तेच ऑफिस, तीच माणसं आणि तेच काम यात त्याला वेगळेपणा काहीच दिसत नसतो. यातून कधी सुटका होईल याचाच विचार करत तो दिवस ढकलत असतो. हे मला बहुतांश ठिकाणी नेहमीच दिसते. तुम्हालाही दिसत असेल. पण आपण याकडे कानाडोळा करत असतो. याउलट भटकंती असलेला, फिरस्तीचा जॉब करणारे मात्र सतत हसतमुख आणि तरतरीत वाटत असतात. कधीही सततच्या प्रवासाचा शीण ते आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी गेल्यावर कितीही समोर अडचणी निर्माण झाल्या तरी त्या सोडविण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असते. रोज नवीन चेहरे, नवीन गाव आणि नवीन विचार यामुळे ठरलेले काम करताना देखील विविधता आणण्यात ते अनुभवाने वाकबगार झालेले असतात. ते कधीच निवृत्तीचा विचार करत नाहीत. वयोमानानुसार निवृत्ती घ्यावी जरी घ्यावी लागली तरी त्यानंतरही मिळालेल्या अनुभव आणि विचारसमृध्दीतून ते स्वतःचं वेगळं काम उभे करायला पुन्हा लोकांत मिसळतात. प्रवासाला निघतात. एकाच ठिकाणी बसून एकाच विचारांच्या माणसात राहून तुम्ही एकाच पद्धतीचे काम करत असता. कामात वेगळेपणा शोधायला बंदिस्त वातावरणात संधी कशी मिळणार..? त्यासाठीच भटकंती हवी. काम कुठलेही असो….जागा, माणसे आणि विचार यात वैविध्य आणले तरच मिळणाऱ्या कामाचा आनंद तुम्हाला चिरतरुण ठेवतो. अनुभवसमृद्ध आणि विचारसमृद्ध व्हायचा हाच खात्रीचा मार्ग आहे.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Roksana Amelia उत्तर रद्द करा.

Comments (

1

)

  1. Roksana Amelia

    I believe so too!
    I love to travel a lot ….
    Travelling makes sense to me over everything else-
    I’m a traveller!

    ♥️

    Liked by 1 person