Make friends with your inner courage…!
If we only listen to our own intellect, we will never be able to make friends with anyone because we will be seen as selfish and self-centered. The whole world will consider us lonely. This is a kind of foolishness. Just as a mountaineering climbs a mountain knowing there is a deep valley ahead, relying on his courage, you too should awaken and befriend the courage within you.
आपण फक्त आपल्याच बुद्धीचे ऐकले तर आपण कधीच कुणाशी मैत्री करू शकणार नाही. कारण आपण स्वार्थी, आपमतलबी म्हणून ओळखले जावू. सगळे जग आपल्याला एकलकोंडा समजेल. हा एकप्रकारचा मूर्खपणाच आहे. समोर खोल दरी आहे हे माहीत असतांनाही आपल्या हिंमतीसोबत मैत्री करत गिर्यारोहक पर्वत चढतो. तो जर त्याच्या हिंमतीच्या पंखांच्या जोरावर दरी पार करत असेल तर तुम्हालाही तुमच्यात असलेल्या हिंमतीला जागे करून मैत्री केली पाहिजे.

‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हा जसा तुमच्या मनोनिग्रहाला बूस्टर डोस देणारे हे संतवचन आहे. पण प्रत्येक सुविचार हा अंमलात आणताना ‘दुधारी’ असतो. आपण त्या सुविचाराची आपल्याला उमगलेली एक बाजूच आपण ध्यानात घेतो. आता बघा ना….आपल्या मनानेच आपल्याला करायचे असं जरी संत सांगत असले तरी त्याअगोदर ते ‘ऐकावे जनाचे’ असंही म्हणतात. म्हणजेच इतरांचे ऐकण्यासाठी तुमचे कान उघडे ठेवा. त्यांचं म्हणणं तुम्हाला पटो अथवा न पटो, तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. याचाच अर्थ तुमची ‘श्रवण शक्ती’ वाढवा. हे केंव्हा होवू शकते ? जेंव्हा तुम्ही इतरांशी सख्य वाढवाल, मैत्री कराल. आजकाल आपण इतरांचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नसतो. मग मैत्री कशी होणार..? काहीजणांना विचारांचा गोंधळ अन् माणसांचा कोलाहल नकोसा होतो. शांत आणि एकल आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो. अशा लोकांना विविध स्तरावरील माणसांशी ओळख वाढावी असं मनातून कधीच वाटत नसतं. किंवा ते गर्दीकडे अतिशय त्रासिक नजरेने बघत असतात.

पण मग ओळख का वाढवायची ? मैत्री का करायची ? तर ‘आत्मबल’ वाढविण्यासाठी. बरेच जण मैत्री ही ‘मदती’साठी गोळा केलेली बाह्यशक्ती समजतात. पण निरपेक्ष मैत्री असावी अश्या आशयाच्या मैत्रीबद्दलच्या व्याख्या मांडल्या जातात. तर भलेही तुम्ही मैत्री जपताना समोरच्याकडून थेट मदतीची अपेक्षा करत नसाल तरी देखील भावनिकदृष्ट्या तुमच्याशी जोडल्या गेलेला व्यक्ती हा तुमचे ‘आत्मबल’ कमजोर होणार नाही याची दक्षता घेत असतो. तुमचे ‘आत्मबल’ कमजोर होईल अशा शक्तींपासून तो सतत तुमचे रक्षण करण्याचे काम करत असतो. व्यक्तिपरत्वे तुम्हाला मैत्री जपता येतच नसेल तर निदान तुम्ही तुमच्या स्वतःशी मैत्री करू शकता. स्वतःशी मैत्री करणे म्हणजे तुमच्या इंद्रियांशी एकरूप होणे. आपोआपच मैत्र जपणारी तुमच्या शरीरातील इंद्रिये तुमचे ‘आत्मबल’ कायम उंच ठेवतात. मग ज्याचे ‘आत्मबल’ प्रबळ तोच खरा समर्थ असतो.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to kegarland उत्तर रद्द करा.