No matter how good I have done, treated other’s well….Why do people always ‘discuss’ about me ? This question bothers everyone. But there may be another side to this question. Are you constantly striving to get people ‘discussing’ you ?
मी कितीही चांगले काम केले, इतरांशी चांगले वागलो….तरी लोक माझ्याविषयी नेहमी ‘चर्चा’ का करत असतात ? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. पण या प्रश्नाची दुसरी बाजू पण असू शकते. नेहमी लोकांनी तुमची ‘चर्चा’ करत रहावं यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील रहाता का ?

काल माझा एक जुना सहकारी मित्र भेटला. माझ्यासोबत काहीकाळ त्याने काम केलेले असल्याने त्याची काम करण्याची क्षमता मी ओळखून आहे. पण काय असतं, बऱ्याच वेळा तुमचे एखाद्याशी पटत असते ते नेमून दिलेल्या कामाच्या संदर्भात जुळणारे विचार असतात म्हणून. आपण एखाद्याला ओळखतो म्हणजे याच अर्थाने असतं. बाकी तुमच्या व्यक्तिगत जीवनात काय उलथापालथ सुरू आहे हे तुम्ही सांगितल्याशिवाय सहकाऱ्यांना कळत नसतं. ती उलथापालथ कामावर परिणाम करणारी असेल तरच तो तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही त्याला खोदून-खोदून विचारता. तर खूप दिवसांनी भेटणाऱ्या सहकाऱ्याच्या आयुष्यात देखील या दरम्यानच्या काळात खूप उलथापालथ झालेली होती. मधल्या काळात फारसा संपर्क नसल्याने त्याच्याबद्दल कानावर फारसं काही आलं नव्हतं. मी देखील कुणाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जोडून घ्यायला फार उत्सुक नसतो. तसा माझा स्वभाव नाही. इतरांच्या ‘प्रॉब्लेम’मध्ये नाक खुपसायला एकतर तुम्ही खूप ‘सोशल’ असावं लागतं किंवा तुम्ही ‘रिकामटेकडे’ असायला हवे. तर या मधल्या काळात विशेषतः कोरोना काळात त्याच्या घरात खूपच आर्थिक तणाव निर्माण झाले. त्यातूनच त्याचे डिव्होर्स पर्यंत प्रकरण ताणले गेले. त्याने मला ही कथा ऐकवली….पण मला माहिती होईपर्यंत विषय खूप लांबवर आलेला होता. एकतर ‘डिव्होर्स’ हा विषय फक्त दोघांमधला असतो. पण आपल्याकडे हा विषय समूहाकडून हाताळल्या जातो. म्हणजे दोघांमध्ये मतभिन्नता येणाऱ्या घटना घडून गेल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर हा तिढा सुटत नसल्याने त्या दोघांच्या ‘प्रॉब्लेम’मध्ये इतरांचा शिरकाव होतो. दोघांनी एकमेकांपासून विलग होण्याचा घेतलेला निर्णय जेव्हढा वेदनादायी असतो त्यापेक्षाही इतरांचा त्या प्रकरणातील शिरकाव मरणप्राय वेदना देणारा असतो. सध्या माझा सहकारी मित्र त्याच वाटेवरून जात आहे. मी त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगून बघितल्या. अर्थात त्याला हे माहिती होतं की, इतरांच्या व्यक्तिगत गोष्टीत मी कधी लक्ष घालत नाही. त्यामुळे मी खूप वरवरचं बोलतोय. मला सांगण्याने त्याचा प्रश्न सुटणार नव्हता. पण त्याला ‘सहानुभूती’ देखील माझ्याकडून मिळणार नव्हती. मग मला तो आपला ‘प्रॉब्लेम’ सांगून बोभाटा का करू पहात होता..?

आजकाल सगळ्यांनाच आपल्या परस्पर आपल्याबद्दल केल्या जाणाऱ्या चर्चेचा, टर उडविण्याचा, बदनामी करण्याचा पराकोटीचा उद्योग सुरू असल्याची जाणीव सतावत असते. अगदी माझ्यासहित आपण सर्वजण यात भरडले जात आहोत. आपल्यासमोर रॉ एव्हढे प्रश्न आ वासून उभे असतात. त्याच्या होणाऱ्या परिणामापेक्षा अधिक परिणाम करणारी चर्चा लोक आपल्याबद्दल करत असतात, हे खूपच चीड आणणारे आणि घृणास्पद असते. अर्थात आपण यातून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने ‘सोल्युशन’ इम्प्लिमेंट करत असतो. बऱ्याचवेळा ते ‘वर्क’ करतं…. बऱ्याचवेळा नाही वर्क करत. मी माझ्यापुरता जालीम उपाय शोधलाय…अर्थात त्यासाठी काहीबाबतीत तुम्हाला ‘मुर्दाड’ बनावं लागतं. मी माझ्या कुटुंबातील सदस्य सोडून सगळ्यांशी ‘प्रोफेशनल’ पद्धतीने वागायला सुरुवात केलीय. जास्त निर्माण होणारी ‘जवळीकता’ ही तुमच्या खासगी विषयात कधी नाक खुपसते हे तुम्हाला देखील कळून येत नाही. विशेषतः नातेवाईकांशी तुम्ही सुरक्षित अंतर ठेवून राहिलात तर तुमच्यासाठी ते खूप चांगले असते. कारण तुमच्याबद्दलची ईर्षा, असूया, तुलना या तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या ‘विषाणूंचा’ जन्म तिथेच होत असतो. कधीतरी शुभ किंवा अशुभ प्रसंगी तुम्हाला भेटणारे नातेवाईक जेंव्हा तुमच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करतात. तेंव्हा नक्कीच समजून जा…येणाऱ्या काही दिवसात तुम्ही त्यांच्या ‘चर्चेचे’ केंद्रबिंदू झालेले आहात. निर्माण झालेली जवळीकता तुमचा शक्तिपात करत असते. तुमच्या विषयी विनाकारण केली जाणारी चर्चा तुम्हाला ‘वाईट’ ठरविण्यात जेव्हढी परिणामकारक ठरत नसते त्यापेक्षा अधिक परिणाम करणारी कृती संतापाच्या भरात तुमच्याकडून होत असते. मग आपोआपच तुम्ही वाईट आहात यावर शिक्कामोर्तब करण्याची संधी तुमच्याकडूनच त्यांना मिळत असते. तेंव्हा पहिल्यांदा हा जालीम उपाय करून बघा….कदाचित हा उपाय तुमच्यासाठी पण ‘वर्क’ करेल.

आता या विषयाची दुसरी बाजू देखील आपण तपासून पाहू. तुम्ही या ना त्या कारणाने सतत चर्चेत रहावे असं तुम्हाला वाटत असतं, किंवा सतत तसा तुमचा प्रयत्न देखील असतो. अशावेळी तुमच्याविषयी पूरक अशी चर्चा करणारा एक ‘जमाव’ तुमच्यापाठिशी असणे गरजेचे असते. अर्थात हा जमाव नातेवाईकांचा असावा की हितचिंतकांचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. या जमावात नेमके कोण असावे ? हा तुमचा तर्क जर योग्य ठरला तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम अवश्य मिळतात. अर्थात हा एक अलिखित व्यवहार असल्याने यात भावनिक जवळीकता निर्माण करण्याचा प्रश्न नसतो. किंवा ती गरज पण नसते. याउलट फसगतीने किंवा माणूस ओळखायला कमी पडल्याने जर या जमावात तुमच्या विरोधकांचा शिरकाव झाला तर शेवटी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या उक्तीप्रमाणे तुम्ही त्याला अतिशय सहजतेने स्वीकारले पाहिजे. कारण तो तुमच्याबद्दल काहीही बोलणारा असला तरी तो तुमच्याबद्दल चर्चा करतोय हेच तुमच्यासाठी महत्वाचे असते. तुम्ही सोशिक-सहनशील असाल तर तुमच्या टिकाकारांचे नक्कीच स्वागत कराल. कारण ते तुमच्या अपरोक्ष तुमचे नाव चर्चेत ठेवत असतात. अशांचा तुम्ही आदर करा. कारण स्वयंप्रकाशित म्हणून स्वतःचे ढुंगण मिरवणारा ‘काजवा’ कितीही दुसऱ्याला प्रकाशाची रेषा दाखविणारा वाटत असला तरी देखील तो अंधारात धडकून स्वतःला संपवून घेत असतो. तेंव्हा काजव्यांना काचेच्या बरणीत गोळा करण्यापेक्षा ताऱ्यांना बरणीत गोळा करण्याची ‘हिकमत’ दाखवा. जगाचे डोळे विस्फारतील असं काही केलं तर तुम्ही नक्कीच चर्चेत याल…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा