परमेश्वर हाच सर्वात मोठा ‘वैद्य’ आणि प्रार्थना हे प्रभावी ‘औषध’..!

Can it be said that the medical sector has expanded, all the facilities have been added to it, the hospital has been modernized i.e. the health-care has become stronger ? We have been hearing the word ‘Medical Hub’ for the past twenty to twenty five years. If the term is used as a one-stop shop for patient’s,has the term become a ‘Commercial Solution’ to encourage ‘Marketisation’ ? Because finally getting rid of the disease is part of fate, while visiting a specialist doctor has become part of our karma.

वैद्यकीय क्षेत्र विस्तारले, त्याला सर्व सुविधांची जोड दिली, हॉस्पिटलचे आधुनिकीकरण केले म्हणजेच आरोग्यसेवा सशक्त झाली असे म्हणता येईल का ? गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून ‘मेडिकल हब’ हा शब्द आपण ऐकतो आहोत. रुग्णांना सर्वप्रकारच्या उपचारसेवा एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण म्हणून जर हा शब्द वापरात येत असेल तर हा शब्द ‘बाजारीकरणाला’ प्रोत्साहन देणारा एक ‘व्यावसायिक उपाय’ ठरला आहे का ? कारण शेवटी रोगमुक्त होणे हा नशिबाचा भाग, तर तज्ज्ञ डॉक्टर भेटणे हा आपल्या कर्माचा भाग बनला आहे.

परवा प्रसिद्ध मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता अतुल परचुरे यांची एक व्हिडिओ क्लिप युट्युबवर पहायला मिळाली. परचुरे यांचं सोलापूरशी नाते असल्याने त्यांचा चाहता वर्गही आमच्या शहरात मोठा आहे. नुकतेच ते कॅन्सरशी लढा देवून पूर्ण बरे झाले आहेत. मात्र हॉस्पिटलाईज झाल्यानंतरचे अतुल परचुरे यांनी जे अनुभव सांगितले ते ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो. सर्वप्रकारच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर देखील जर डॉक्टरांना निश्चित निदान करता आले नाही तर रुग्णाच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवतो. अतुल परचुरे हे प्रसिद्ध अभिनेते असतानाही त्यांच्या बाबतीत ‘निम हकीम खतरे जान’ची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी त्यांनी हॉस्पिटल बदलले….लाखो रुपये पाण्यात गेल्यावर नशिबाने त्यांना तज्ज्ञ डॉक्टर भेटले. ट्युमरचे ऑपरेशन यशस्वी होवून ते कॅन्सरमुक्त झालेत. दुसरी घटना तर माझे नाट्यकलावंत असलेले जवळचे मित्र सोलापूरचेच रणधीर अभ्यंकर यांच्या बाबतीत घडलेला. ऑर्थो प्रॉब्लेममुळे हॉस्पिटलाईज झालेल्या अभ्यंकरवर एका हॉस्पिटलमध्ये दुर्लक्षच करण्यात आले. योग्य निदाना अभावी उशीर झाल्याने त्यांच्यावर गुडघ्यापासून खाली पाय कापायची वेळ आली. आज कृत्रिम पाय लावून ते पुन्हा कार्यमग्न झालेत. या दोन्ही उदाहरणामधील रुग्ण हे आर्थिक फटका सहन करणारे होते म्हणून योग्य निदान आणि उपचारासाठी यातायात करू शकले. पण सर्वसामान्य रुग्णांचं काय ? आजकाल सर्रासपणे रुग्णाला अगोदर हॉस्पिटलमध्ये ‘ऍडमिट’ करून घेण्याची घाई केली जाते. सुविधांयुक्त उपचाराच्या नावाखाली रूम मध्ये प्रसंगी आयसीयूमध्ये दाखल केल्यावर सर्वप्रकारच्या चाचण्या-तपासण्या सुरू केल्या जातात. यामध्येच रग्गड पैसे उकळले जातात. मग दाखल झालेल्या रुग्णावर केलेले उपचार यशस्वी होत नाहीत हे रुग्णाच्या अथवा त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांना बागुलबुवाची भीती दाखवत रुग्णाला घरी घेवून जाण्यासाठी सुचवायचे. ही प्रॅक्टिस अलीकडच्या काळात अनेक हॉस्पिटलमधून सुरू असल्याचे किस्से वेळोवेळी समाजापुढे येतात.

आज शहराच्या अर्थकारणाबद्दल आशावादी चित्र निर्माण करताना ‘मेडिकल टुरिझम’बाबत भरभरून बोललं जातं. ज्या शहरात नागरी सुविधा आणि आरोग्य सेवा दर्जेदार आहेत, त्या शहरांचा विकास गतिमानतेने होतो. ही अर्थशास्त्रीय व्याख्या जरी खरी असली तरी ‘सुविधांयुक्त’चा वापर निव्वळ ‘व्यावसायिक’ निकषांवर होत असेल तर हा विकासाला होणारा अडथळा नव्हे का ? इतर क्षेत्रातील चुकीचे होत असलेले व्यवहार हे निदान आर्थिक नुकसानी पर्यंत जावून थांबणारे तरी असतात. पण वैद्यकीय क्षेत्रात जर हे घडत असेल तर….आर्थिक नुकसानी बरोबरच जीवित हानी देखील सहन करण्याची पाळी येवू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धा अतिशय निरंकुश पद्धतीने वाढत असल्याची काही तज्ज्ञ डॉक्टर खासगीत भीती व्यक्त करतात. पण समव्यवसायिक असल्याने ते उघडपणे बोलायला कचरतात. एव्हढेच ! शेवटी परमेश्वर हाच सर्वात मोठा ‘वैद्य’ आणि ‘प्रार्थना’ हेच सर्वात प्रभावी ‘औषध’ ठरते…!!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to gosavimanik123 उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. jnzende

    100% सत्य

    Liked by 1 person

  2. Nagesh Dharne

    यावर उपाय काय

    Liked by 1 person

  3. gosavimanik123

    वैध्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धा…….
    ✍️✍️☑️☑️

    Liked by 1 person