ऑफिसमधील ‘प्रेशर’ सहन होत नाही….!

No matter how well-planned you are in office work, the increasing pressure to complete management work often becomes unwelcome. Sometimes it feels good to use the loopholes where I can push that pressure to my teammates and be free. But if this happens all the times, your colleagues will think that you are a pushover from the management side. So your skill is to keep the increasing pressure from your superiors to yourself.

कार्यालयीन काम करताना तुमचे नियोजन कितीही चांगले असले तरी व्यवस्थापनाचा काम पूर्ण करून घेण्यासाठीचा वाढता दबाव बऱ्याचवेळा नकोसा होतो. अश्यावेळी मी तो दबाव माझ्या सहकाऱ्यांच्या अंगावर ढकलून मोकळा होईन ही पळवाट उपयोगात आणणे काहीवेळा ठीक वाटते. पण हे नेहमीच घडू लागले तर तुम्ही व्यवस्थापनाच्या बाजूने दबाव निर्माण करणारे आहात असा तुमच्या सहकाऱ्यांचा समज होईल. त्यामुळे तुमच्या वरिष्ठांकडून कामासाठी तुमच्यावर येणारा वाढता दबाव तुमच्यापर्यंत ठेवण्यातच तुमचे कौशल्य आहे.

आजकाल कार्पोरेट कल्चरमुळे ऑफिसवर्क ही एक नवी प्रणाली उदयाला आली आहे. या प्रणालीने आखून दिलेल्या नियमांनुसारच केलेले काम ग्राह्य धरण्यात येते. मुळात तुम्हाला जॉबवर घेतानाच तुमची क्षमता तपासण्यासाठी जो इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळीच याची शहानिशा केलेली असते. अर्थात जॉब मिळविण्यासाठी तुम्ही मुलाखतीमध्ये दाखवलेली एक्स्ट्रा एनर्जी सिलेक्ट झाल्यानंतर जर प्रत्यक्ष कामात दिसली नाही तर व्यवस्थापन तुम्हाला कामावरून कमी करायला अजिबात मागेपुढे पहात नसते. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसारच तुमच्या कडून काम करवून घेण्यात व्यवस्थापनाला रस असतो. तुम्हाला जॉबवर घेतल्यानंतर तुम्ही सिस्टीममध्ये राहूनच काम करावे यासाठी व्यवस्थापन तुमच्या प्रशिक्षणावर तुमच्या सॅलरी व्यतिरिक्त खर्च करत असते. तुम्हाला काम करण्यासाठी पोषक वातावरण मिळावे याचा देखील व्यवस्थापनाने वेगळा विचार केलेला असतो. त्यामुळे अशा मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत असताना तुम्ही अधिक काम करावे हीच कोणत्याही व्यवस्थापनाची अपेक्षा असते.

परवा एक जुना सहकारी भेटला…..आस्थेने माझी विचारपूस केली. सोबत काम करत असताना वरिष्ठांजवळ माझ्याबद्दल जेव्हढं काही नकारात्मक सांगता येईल ते सांगणारा माणूस पुन्हा भेटू नये असंच वाटत असतं. बरं भेटला आणि आस्थेवाईकपणे चौकशी करायला लागला की मस्तकातील शीर आपोआप ठणकायला लागत असते…हा अनुभव सर्वमान्य होईल असाच असतो. मला म्हणाला….’तुझा जॉबमधून बाहेर पडण्याचा निर्णय योग्यच होता, आत्ता पटतंय ते….शेवटी बॉस हा बॉसच असतो. मी म्हणालो, ‘ अरे पण मी बॉसच्या जाचाला कंटाळून जॉब सोडला असं कधी म्हणालो’ त्यावर त्यानं लगेच तयार उत्तर तोंडावर फेकलं….तू कोणत्या विचाराने जॉब सोडला याला काय महत्व आहे ? तुझ्या पश्चात ऑफिसमध्ये हीच चर्चा होते…..माझ्या सहकाऱ्यासारखा प्रत्येकाला एकतरी सहकारी भेटतच असतो. जो केवळ इर्षेच्या नादात आपली प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नात कायम असतो. अशा सहकाऱ्यांपासून नेहमीच चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या अधोगतीवर त्यांची प्रगती अवलंबून असते. कामाला प्राधान्य देणारा बॉस मिळणे हा नोकरीच्या कालावधीतील सुखद काळ समजला जातो. असा बॉस फक्त कामावर आपले लक्ष केंद्रित करत असतो. त्यानुसारच तो आपल्या टीमचे मूल्यमापन करत असतो. याउलट कंपूगिरीला महत्व देणारा बॉस मिळाला तर मात्र तुमचा परीक्षा घेणारा काळ सुरू झाला असं समजायला हरकत नसावी. शक्यतो अनुभवातून पदोन्नती मिळालेल्या वरिष्ठांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्या, सहजता आणि नवीन काहीतरी शिकायला मिळाल्याचा नक्कीच आनंद मिळतो.

आजकाल जॉब करणाऱ्या प्रत्येकाला ‘टार्गेट’ हा फार सतावणारा मुद्दा झालेला आहे. हे टार्गेट सेट करणारा जो कुणी व्यक्ती असतो तोच आपल्या फजितीचं राजकारण करू पाहतोय यावर आपला दृढ विश्वास बसलेला असतो. मुळात शून्यापासून सुरू झालेला आपला टार्गेट बोर्ड मायनस डिजिट पर्यंत कसा पोहोचला ? याचा आपण तटस्थपणे कधीच विचार करायला तयार नसतो. कारण आपल्या विरोधात ऑफिसमध्ये कुणीतरी कट-कारस्थान करतंय या गॉसिपमध्येच आपण इतके खोलवर रुतलेलो असतो की हे टार्गेट आपणच तयार केलंय याचाही आपल्याला विसर पडलेला असतो. तुमच्यासमोर टार्गेट ठेवताना तुमच्याकडूनच डाटा मागविलेला असतो हे आपण पार विसरून जातो. बॉसला इम्प्रेस करण्याच्या नादात इतरांपेक्षा जास्त आकर्षित करणारा डाटा आणि त्यावर अतिशय सकारात्मक भाषेत स्वप्नरंजन करणारा खुलासा आपणच बॉसला केलेला असतो….मग न झेपणारे टार्गेट छातीवर दडपण आणायला लागले की धडपडणे म्हणजे स्वतःच विणलेल्या जाळ्यात कोळ्याने अडकण्या सारखेच आहे. आपला वेगळेपणा हा प्रत्यक्ष कामातून दाखवायचा असतो. त्यासाठी वेळोवेळी जोखीम (रिस्क) ही घ्यायलाच हवी कारण गच्च दाटून आलेलं आभाळ कधीतरी मोकळं होणारच असतं. जाता-जाता….तुमच्याशी हितगुज करण्यासाठी ब्लॉगिंग या माझ्यासाठी नवीन असलेल्या माध्यमात अगदी नव्याने शिकत लेखन करत आर्टिकलवर आपल्यासारख्या वाचकांकडून मिळणाऱ्या ‘लाईक’चा हजाराचा टप्पा पार केलाय याचा मनस्वी आनंद आपल्याला शेअर करावासा वाटतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to KK उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. Nagesh Dharne

    खूप सत्य

    Liked by 1 person

  2. jnzende

    👍1001

    Liked by 1 person

  3. KK

    खूप छान। अनेक अभिनंदन।

    Liked by 1 person