राष्ट्रवादी फुटल्याचे शंभर दिवसांनी खरं वाटतंय..!
स्थापनेपासूनच सत्तेसाठी जन्मलेला राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि वरदहस्ताची कृपादृष्टी घेत राजकारणाचे धडे गिरवलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यात भाजप महायुतीच्या सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद घेतल्याचे थोरल्या पवारांना पचनी पडले नव्हते. गेल्या शंभर दिवसात महाराष्ट्रातील जनतेलाही सत्तेसाठी ‘काका-पुतण्याने’ रंगवलेला डाव आहे असेच वाटत होते. मात्र काल शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धाकले साहेब अजितदादांनी दोन पानी पत्राद्वारे जे मनोगत मांडले आहे त्यात थोरल्या पवार साहेबांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळत राष्ट्रवादी पक्ष फुटला हे सत्य असल्याचाच एकप्रकारे निर्वाळा दिला आहे.

२ जुलै २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप महायुतीच्या सरकारमध्ये सामील होत धाकले साहेब अजितदादा यांनी अर्धीअधिक राष्ट्रवादी आपल्यासोबत आणली. शपथविधी झाल्यानंतरही महाराष्ट्र या बंडाळीवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. पक्षाचे प्रवक्ते देखील या विषयावर बोलण्यासाठी सावरलेले नव्हते. मागे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेचा शपथविधी करत अजितदादांनी केलेली बंडाळी फसली होती. त्यामुळे ही बंडाळी देखील काही दिवसांनी थंड होईल असाच सर्वांचा कयास होता. आजवर पदासाठी आणि राजकीय अहमिकेसाठी राजकीय घराण्यातून काका-पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्राने यापूर्वीही बघितला आहे. मुंडे, ठाकरे, मोहिते-पाटील अशी राजकीय वजनदार घराण्यातील हा संघर्ष महाराष्ट्राला अलीकडच्या काळात अगदी जवळून अनुभवायला मिळाला आहे. मात्र सत्तेसाठी राजकारण हेच तत्व आचरणात आणणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्यात सत्तेच्या अहमिकेतून उभी फूट पडेल यावर विश्वास ठेवायला महाराष्ट्र कचरत होता.

अर्थात अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदासाठी किंवा भाजपासोबत जाण्यासाठी पक्षात बंड केले हे मात्र कारण पटत नसल्यानेच अजितदादांच्या दुसऱ्या वेळी केलेल्या बंडाळीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप वगैरे जाणवला नसावा. जर सत्तेसाठी अजितदादा भाजपासोबत गेले असते तर पहिल्या खेपेस पहाटेच्या शपथविधीचा थोरल्या पवार साहेबांनी ‘बल्ल्या’ केला नसता. पुन्हा गोडीगुलाबीने अजितदादांना पक्षात आणण्याचा खटाटोप झाला नसता. एकतर दुसरे पक्ष फोडून स्वतःची सत्ता राबवण्याच्या कलेत पारंगत असलेल्या थोरल्या साहेबांना आपल्या हयातीतच पक्षांतर्गत बंडाळी ‘इगो हर्ट’ करणारी वाटली असावी का ? पण ‘इगो हर्ट’ करून घेण्याइतपत थोरले साहेब हे काही कच्चे वस्ताद नाहीत. त्यांना राजकारणात तेल लावलेला पहिलवान उगीच म्हणत नाहीत. बरं थोरल्या साहेबांनी यापूर्वी तीन वेळा धाकल्या पवारांना उपमुख्यमंत्री केले होतेच ना ! म्हणजेच अजितदादांची बंडाळी ही सत्तेत सामील होण्यासाठी नव्हती अशी शंका घ्यायला जागा आहे.

खरा संघर्ष हा नेतृत्वाचा वारसदार याच मुद्द्यावर असावा अशी आता महाराष्ट्रात उघड चर्चा सुरू आहे. पक्षावर वर्चस्व कुणाचे ? हेच बंडाळीचे मुख्य कारण असू शकते. बरं यातही नवीन असं काहीच नाही. राजकीय घराण्यांमध्ये हे घडतच असतं. यातून पवार घराण्याचीही सुटका होणार नव्हती. मात्र इथे थोरल्या साहेबांचा ‘इगो’ नक्कीच दुखावला असणार. महाराष्ट्रातील इतर नामांकित राजकीय घराण्यात घडलेल्या बंडाळीत थोरल्या साहेबांनी अगदी रामशास्त्री प्रभुणे सारखी भूमिका निभावली होती. आता आपल्याच घरातील बंडाळी जगासमोर आली तर किती रामशास्त्री प्रभुणे हात धुवून घेतील ? यातूनच थोरल्या साहेबांचा ‘इगो हर्ट’ झाला असावा. मात्र आतून कितीही ‘धुसफूस’ सुरू असली तरी ‘दादा परत येतील’ या मंत्राचा जप सुरूच होता. शिवाय रुसवा काढल्यावर दादा परत जातात हे महाराष्ट्रानेही पाहिलेले होते. त्यामुळेच पक्षांतर्गत बंडाळी नंतर शंभर दिवस झाले तरीही महाराष्ट्र यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. हे सर्व नाट्य सत्तेसाठीच काका-पुतण्या मिळून करत असावेत हीच चर्चा राज्यात होती.


सत्तेत सहभागी होवून १० ऑक्टोबरला शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून जे दोन पानी मनोगत लिहिले आहे त्यात सुरुवातीच्या परिच्छेदतच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले-शाहू- आंबेडकर यांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे लोककल्याणाचे धोरण वारसा म्हणून जपणाऱ्या माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाने…..अशी सुरुवात करत पक्षाचे संस्थापक असलेले थोरले साहेब आदरणीय शरदचंद्र पवार यांचा नामोल्लेख टाळत धाकल्या पवार साहेबांनी परतीचा दोरच कापून टाकला आहे. आता थोरल्या साहेबांची आणि उद्धव ठाकरे यांची अवस्था सारखीच झालीय. त्यामुळे आगामी निवडणुकात ठाकरे-पवार विरुद्ध शिंदे-पवार या कुस्त्यांच्या दंगलीत तेल लावलेला पहिलवान भाजपा ठरणार का ? आता हाच राजकीय गेम बघायचा शिल्लक आहे. बाकी पक्षावर हक्क सांगणे आणि त्याचे न्यायनिवाडे म्हणजे तारीख पे तारीख ….तारीख पे तारीख.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.